Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Mahayuti government oath taking ceremony: महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, एकनाथ शिंदे नेमकं काय करणार, राजकीय वर्तुळाला उत्सुकता.
मुंबई: राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली होती. यावेळी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने (BJP) नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली होती. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदानंतर खालच्या पायरीवर असणारे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. आपल्याऐवजी शिवसेनेतील अन्य एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री पद द्यावे आणि मी सरकारमधून बाहेर राहीन, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, भाजपला एकनाथ शिंदे यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समजते. यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, भाजप ही मागणी मान्य करेल, असे दिसत नाही. कारण श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यास ते थेट अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पंक्तीला येऊन बसतील. श्रीकांत शिंदे यांचा राजकीय अनुभव हा अजित पवारांपेक्षा बराच कमी आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे हे आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सरकारमध्ये कोणतेही निर्णय घेताना आक्रमक भूमिका घेतल्यास समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बसवल्यास घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो.
याशिवाय, भाजपला महायुतीचे सरकार चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याची आवश्यकता आहे. गेल्या काही काळात एकनाथ शिंदे हे राज्यातील मराठा समाजाचा चेहरा बनले आहेत. मनोज जरांगे यांच्यासारखे मराठा आंदोलकही एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदर बाळगून आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाल्यास महायुती सरकारला एकनाथ शिंदे यांची गरज लागू शकते.
अजित पवारांवर वचक ठेवण्यासाठी शिंदे आवश्यक?
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकारबाहेर बसणे पसंत केले तर अजित पवार यांची सरकारमधील ताकद आणि प्रभाव वाढू शकते. हा प्रभाव मर्यादित ठेवण्यासाठी महायुती सरकारला एकनाथ शिंदे यांची गरज आहे. तसेच राज्यात मराठा समाजाच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास चांगला संदेश जाऊ शकतो. या सगळ्या कारणांमुळे भाजपला एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये हवे आहेत.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्त्वाची खाती मागितली आहेत. त्यांच्या या मागण्या मान्य होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
आणखी वाचा
मोठी बातमी : महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार, महायुतीत मोठ्या घडामोडी