(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार?; आतापर्यंतचं जरांगेंचं सर्वात मोठं वक्तव्य
Manoj Jarange : ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, यावर आज मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले जरांगे?
मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचं की नाही या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, "आमचं जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळणारच. मात्र, त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे. आमचं हक्काचं आहे त्यामुळे आम्ही का सोडायचं. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा कोणत्या कारणासाठी विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट करावं. आमचं जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे, असे जरांगे म्हणाले आहे.
पुरावे असून देखील 40 वर्ष मराठ्यांचं वाटोळं
सरकारकडून जोमात काम सुरु आहे. प्रमाणपत्र हातात पडेल त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात काम सुरु आहे. सरकारकडून दिरंगाई होत नाही. माझी तब्येत देखील ठणठणीत असून, पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. मराठा समाजाच्या नोंदी आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसीत आरक्षण मिळाले पाहिजे अशी ओबीसी समाजाची भुमिका आहे. पुरावे असून देखील 40 वर्ष मराठ्यांचं वाटोळं झालं. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही. पण आता सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर कोणामुळे आरक्षण मिळालं नाही त्यांची नावं समोर आणणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
विनोद पाटलांची वेगळी भूमिका?
मनोज जरांगे यांनी ओबीसींना मिळणारे सर्व हक्क आम्हाला मिळाले पाहिजे असे सांगत, राजकीय आरक्षणावर देखील अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. मात्र, मागील आठवड्यात यावर प्रतिक्रिया देतांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. यावेळी बोलतांना विनोद पाटील म्हणाले होते की, आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं आहे. कुठेही आम्ही राजकीय आरक्षण मागितले नाही. मराठा समाजाला मोठमोठी राजकीय पद मिळून देखील समाजाचा विकास झाला नाही. त्यामुळे आरक्षणाचे प्रमाणपत्र घेऊन पुन्हा त्याच राजकारणात जाण्याची आमची मानसिकता नाही, असे विनोद पाटील म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: