छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श घोटाळ्याचा आणखी एक बळी, 14 लाखांच्या ठेवीच्या धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका
Adarsh Scam : मयत श्रीनिवास तोतला यांच्यावर गेल्या 22 दिवसापासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) आदर्श घोटाळ्याचा (Adarsh Scam) आणखी एकाचा बळी गेला आहे. आदर्श सहकारी पतसंस्थेत ठेवीदार असलेल्या निवास कन्हैयालाल तोतला (वय 78 वर्षे) यांचे आज निधन झाले आहे. आदर्श सहकारी पतसंस्थेत त्यांचे 14 लाख रुपये जमा होते. मात्र, आदर्शमध्ये घोटाळा समोर आल्यानंतर तोतला यांना मानसिक धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते कोमात गेले होते. गेल्या 22 दिवसापासून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर आज सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.
छत्रपती संभाजीनगर आदर्श सहकारी पतसंस्थेत तब्बल 200 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे हजारो ठेवीदार सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात या प्प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटल्याचे तपासातून समोर आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी अंबादास मानकापेसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तपास वेगाने होत नसून, यातील अनेक आरोपी अजूनही फरार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, याच मानसिक धक्क्यामुळे श्रीनिवास तोतला यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या 22 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
यापूर्वी दोघांचा मृत्यू...
आदर्श घोटाळ्यात तोतला यांचा हा तिसरा बळी आहे. यापूर्वी एकाने आत्महत्या केली होती, तर दुसऱ्याचा ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावातून मृत्यू झाला होता. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने लाडगाव येथील 38 वर्षीय रामेश्वर नारायण इथर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर आदर्श बँकेत ठेवलेली 27 लाखांची ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावात करमाड भागातील भानुदास उकर्डे यांचा ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावातून मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 1 कोटी रुपयांची ठेव बँकेत आहे. आधीच दोघांचा बळी गेला असतांना आता तोतला यांचा देखील मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल...
दोन दिवसांपूर्वीच ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यावेळी ठेवीदार यांच्यासह जलील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळ उडाला होता. शेवटी याची दखल मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आदर्शच्या मानकापेची मालमत्ता जप्त करुन ठेवीदारांची रक्कम परत देऊ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जलील यांनी रुग्णालयात जाऊन श्रीनिवास यांची भेट घेतली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने आदर्शच्या ठेवीदारांमध्ये मोठा संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या:
Adarsh Scam : आदर्श घोटाळ्याचा दुसरा बळी, पैसे बुडण्याच्या धास्तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्यू