एक्स्प्लोर
भाजपमध्ये आलेल्या नेत्यांमुळं पक्षाला फायदाच झाला, चंद्रकांत पाटील यांचं घूमजाव
भाजपमधील मेगाभरतीवरील वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केलं आहे. आयारामांमुळे फायदा झाला असल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. कालच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

मुंबई : मेगाभरतीमुळं भाजपची संस्कृती बिघडली असं विधान करणारे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी घूमजाव केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांमुळं भाजपला फायदाच झाला असं स्पष्टीकरण आज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पिंपरीतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात खंत व्यक्त करणारे सूर आळवले होते. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आज मुंबईत पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी पाटील म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करतो. मेगाभरतीचा निर्णय हा कोणा एकट्याचा नाही तर तो कोअर कमिटीचा निर्णय होता असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपामध्ये जुन्या लोकांना डावललं नाही असा त्यांनी दावा केला. बाहेरुन आलेल्या फक्त 27 जणांना तिकिट दिली असेही त्यांनी सांगितले. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, अशी स्पष्ट कबुलीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. निवडणुकीच्या काळात बाहेरुन आलेल्या लोकांना संधी मिळाली. पण पक्षाच्या हृदयाजवळच्या लोकांना संधी मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. खुद्द पक्षाध्यक्षांनीच मेगाभरतीला वाचा फोडल्याने भाजपमधला हा असंतोष कदाचित वाढीस लागण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली होती. या धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भाजपला देवो अशा शब्दात त्यांनी टोला हाणला होता. या दिग्गजांनी केला भाजप प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. संबंधित बातम्या
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























