(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paper Leak : पेपरफुटीचं मायाजाल... बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जण अटकेत, एकूण आरोपींची संख्या सातवर
Buldhana Paper Leak Case: बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून एकूण आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे.
Buldhana Paper Leak Case: बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती मिळतेय. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहोचली आहे. तसेच, अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत.
बुलढाण्यात फुटलेला विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर
बारावी बोर्डाचा आज गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी सर्व वृत्तवाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्यान, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेलं नव्हतं. यामुळे इयत्ता बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन
बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. बुलढाण्यातील कथित पेपरफुटी प्रकरणी पेपर फुटला नसल्याचा बोर्डाने केला होता.
प्रकरण नेमकं काय?
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News) बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak) सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान, मात्र...
बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल होण्याचे प्रकरण समोर येत आहेत. एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI