Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
Amit Shah in Parliament babasaheb Ambedkar: उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले. अमित शाहांच्या तोंडातून विकृत मनुस्मृती बाहेर पडली.
मुंबई: संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला. अमित शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य करणे अमित शाह यांना शक्य नाही. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमित शाह यांनी अत्यंत उर्मटपणे संविधान लिहणाऱ्या महाराष्ट्राचा सुपुत्राचा आणि महामानवाचा अपमान केला. आंबेडकर, आंबेडकर असा जप करण्याऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता, असे अमित शाह यांनी म्हटले. अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत.
अशावेळी भाजपला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा हा अपमान मान्य आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे. ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे. भाजपचे नेते जिथे दिसतील तिथे त्यांना गाठून अमित शाह यांचे वक्तव्य मान्य आहे का, हे विचारले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पुसायला निघाला आहे. पण आंबेडकरांचे नाव कधीही पुसले जाणार नाही. डॉ. आंबेडकर हे मनस्मृतीला कंटाळले होते. आम्हाला मनासारखं जगू द्या, असे ते म्हणत होते. पण मनुस्मृतीच्या विचारांच्या लोकांनी जगू न दिल्यामुळे बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडला. तीच मनोविकृती अमित शाह यांच्या तोंडातून संसदेतून बाहेर पडली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
आणखी वाचा