(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldana Rain : बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता; बळीराजा चिंतेत
Buldana Rain : मध्यरात्रीनंतर बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा (Farmers) मात्र धास्तावला आहे.
Buldana Rain News : सध्या एकीकडं राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) सुरु असतानाच दुसरीकडं काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. त्यामुळं कधी थंडी तर कधी पाऊस असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा (Farmers) मात्र धास्तावला आहे. कारण या पावसामुळं हातातोंडाशी आलेली पीकं वाया जाण्याच शक्यता निर्माण झाली आहे.
तुरीसह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कारण हाती आलेली पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात विजासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस, पिकांना फटका बसण्याची शक्यता
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी सांगितले की, विदर्भात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडेल. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल दिवसभर आणि आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळपासूनच कुठं कुठं धुक्याची चादर पाहायला मिळाली. या अवकाळी पावसानं हरभरा आणि गहू पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
भंडारा गोंदियातही पावसाची हजेरी
आज मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. काल (4 जानेवारी 2023) भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून तिथे ढगाळ वातावरण होते. या दोन्ही जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास हलक्या पावसानं हजेरी लावली होती. या पावसाचा पिकांवर परिणाम होत आहे. ढगाळ हवामानाचा जिल्ह्यातील तूर आणि पालेभाज्यांना पिकांना मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळं तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी रिमझिम पावसाच्या हजेरीने पालेभाजी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
रब्बी हंगामातील पिकांना धोका
दरम्यान, राज्यात गारठा वाढला असताना काही भागात मात्र, पावसानं हजेरी लावली आहे. सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. आधीच अतिवृष्टी झाल्यामुळं मराठवाडा आमि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातची पीक वाया गेली आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. खरीप हंगाम वाया गेला असला तरी या रब्बी हंगामात हाती काही लागेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, आता रब्बी हंगामातील पिकांनाही अस्मानी संकटाचा फटका बसत आहे. त्यामुळं रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: