प्रसंगावधान राखलं म्हणूनच... बुलढाण्यात बर्निंग ट्रकचा थरार, चालत्या ट्रकनं घेतला अचानक पेट
Maharashtra News: दिवाळीच्या (Diwali 2023) फटाक्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशीच एक घटना रविवारी मध्यरात्री घडली.
Buldhana News: मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून (Mumbai - Nagpur National Highway) दिवाळीच्या मध्यरात्रीला प्रवास करणाऱ्या एका चालत्या ट्रकनं (Burning Truck) अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे या महामार्गावर बर्निंग ट्रकचा (Burning Truck) थरार बघायला मिळाला. चालकानं प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला लावल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी या आगीत ट्रक आणि त्यामध्ये असलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
लाखो रुपयांच्या साड्यांची राख रांगोळी
दिवाळीच्या (Diwali 2023) फटाक्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशीच एक घटना रविवारी मध्यरात्री घडली. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक असून तो सुरतहून नागपूरकडे निघाला होता. दरम्यान, या ट्रकला अचानक आग लागल्याचं ट्रक चालकाला आढळून आलं. क्षणाचाही विलंब न करता वाहन चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. समय सुचकतेमुळे सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या आहेत. लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे.
नागपूर शहरात देखील अनेक ठिकाणी आगीच्या घटना
दिवाळीसारख्या आनंददायी पर्वावर वायू प्रदूषणाच्या कारणांमुळे उच्च न्यायालयानं काही सूचना जारी केल्या होत्या. या निर्देशाप्रमाणे मनपासह नागपूर पोलीस विभागाला फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली होती. ज्यामध्ये सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजतापर्यंत फटाके फोडता येईल, अशा सूचना दिल्या होत्या. शिवाय दिलेल्या वेळेचं पालन न केल्यास कार्यवाहीच्या दृष्टीनं देखील उच्च न्यायालयातर्फे सूचना दिल्या होत्या. मात्र शहरात अनेक ठिकाणी या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं चित्र बघायला मिळालं. फटाक्यांमुळे नागपुरात काही आगीच्या घटना देखील घडल्या आहेत. ज्यामधे गणेशपेठ आणि संतनामी नगर येथील घटनेचा समावेश आहे.