Buldhana: अजबच! आधी डोक्याला खाज, मग 3 दिवसानं थेट टक्कलच? बुलढाण्यात विचित्र आजाराने नागरिक हैराण, आरोग्य पथक पोहचलं गावात
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील काही गावात लोकांना विचित्र आजार झाल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत. या आजाराची माहिती मिळताच आरोग्य पथक या ठिकाणी पोहचले आहे.
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ग्रामस्थ एका वेगळ्याच भीतीच्या छायेखाली वावरत आहे. याचं कारणही तितकंच अजब आहे. सुरुवातीला डोक्याला खाज येणे, यानंतर तीन दिवसातच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. एक तर आधीच चीनमधून भारतात आलेल्या HMPV विषाणूमुळे लोक चिंतेत आहे. त्यात आता हा कोणता भयंकर आजार? असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे. जाणून घ्या नेमका हा आजार काय आहे? आरोग्य विभागाचं याबाबत काय म्हणणं आहे?
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामस्थांना विचित्र आजार...
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे, त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल पडणे. अशा विचित्र आजाराने ग्रासलयं. या परिसरात आता भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे 13 लोकांना तर कठोरा येथील 07 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलं आहे. नेमका हा काय आजार आहे..? याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही. तरी मात्र या गावात आरोग्य पथक पोहोचल असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचे काम सुरू झालं आहे. या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र या परिसरात भीतीच वातावरण उद्भवलं आहे.
आरोग्य पथक पोहचले गावात, सर्व्हेक्षण सुरू..
बुलढाणा जिल्ह्यातील या विचित्र आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभाग तातडीने इथल्या गावात पोहचले आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, हिंगणा आणि भोटा गावात या विचित्र आजारामुळे तीन दिवसात अनेकांचे टक्कल पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोग्य पथक इथल्या विविध गावात जाऊन सर्वेक्षण करत आहे. जेणेकरून या आजाराबद्दल काही समजू शकेल.
आरोग्य विभागाकडून पत्रात काय म्हटलंय?
आरोग्य विभागाच्या पत्रात म्हटलंय, दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी संबंधित गावांमध्ये सर्वेक्षण केले असता कालवड येथे 13 रुग्ण केस गळतीचे तसेच कठोरा येथे 7 रुग्ण आढळून आले आहेत. वरील सर्व रुग्णांची माहिती काढली असता, गावातील सर्व नागरिक गे बोरवेलचे पाणी आंघोळीला आणि इतर कामांसाठी वापरतात. ज्यामुळे केस गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असं वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्रात म्हटलंय.