Bhandara News : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात जळालेल्या अवस्थेत आढळला
Bhandara : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात जळालेल्या अवस्थेत आढळला. तपासानंतरच श्रद्धा सिडामच्या हत्येचे रहस्य उलगडणार आहे.
Bhanadara News : भंडाऱ्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह (Dead Body) गावालगत असलेल्या एका शेतातील तनशीच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत आढळला. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा खुर्द इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. श्रद्धा किशोर सिडाम असं या मृत मुलीचं नाव आहे.
संबंधित मुलगी सोमवारी (29 नोव्हेंबर) खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. परंतु सायंकाळपासून ती बेपत्ता झाली. कुटुंबियांनी शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. अखेर आज या मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेतात आढळल्याने कुटुंबियांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
खेळण्यासाठी घराबाहेर पडली, पण परत आलीच नाही
भंडारा जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम असल्याने शाळेने सोमवारी दुपारनंतर सुट्टी दिली होती. त्यामुळे इयत्ता तिसरीत शिकणारी श्रद्धा किशोर सिडाम (वय 8 वर्षे) ही घराशेजारी खेळायला गेली होती. मात्र, संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबियांना तिची काळजी वाटू लागली. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर कुटुंबियांनी साकोली पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वतः पोलीस पथकासह गावात भेट देत, रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोध घेतला. आज (30 नोव्हेंबर) पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार होती. त्याआधीच ग्रामस्थांना श्रद्धाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळला. गावालगत असलेल्या एका शेतातील धानाची तनस जळाल्याने ग्रामस्थ ते बघण्यासाठी गेले असता तिथे त्यांना या तनससोबतच इतरही काही जळाल्याचं दिसलं. बेपत्ता असलेल्या श्रद्धाचा मृतदेह असल्याचं समोर आलं. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
तपासाअंती श्रद्धाच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार
घटनास्थळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कतकडे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिसांचा मोठा फौजफाटा, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक गावात पोहोचले होतं. श्रद्धाच्या बेपत्ता होण्यामागचं कारण काय? ती कुठे गेली होती? अचानक तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने तिच्यासोबत नेमकं काय घडलं असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भंडारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तपासानंतरच श्रद्धा सिडामच्या हत्येचे रहस्य उलगडणार आहे. परंतु आठ वर्षांच्या मुलीला गमावल्याने सिडाम कुटुंबावर शोककळा पसरली आहे.