भंडाऱ्यात यावर्षीच्या सर्वात कमी तापमानाची नोंद, थंडीपासून बचावासाठी काय उपाययोजना कराव्या?
भंडाऱ्यात (Bhandara) आज यावर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. भंडाऱ्यात आज 9 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Bhandara Temperature: भंडाऱ्यात (Bhandara) आज यावर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. भंडाऱ्यात आज 9 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज रात्री शीत लहरी प्रवाहित होण्याचा अंदाज हवामान विभागानं (Meteorological Department) वर्तवला असून भंडारा जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच घराबाहेर नं पडण्याचा सल्ला देखील दिला आहे. नागरिकांनी गारव्यापासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतल्याचं चित्र बघायला मिळत आहे. यापूर्वी भंडाऱ्यात 28 जानेवारी 2021 ला 7 अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.
शीत लहरींपासून बचावासाठी काय उपाययोजना कराव्या?
शक्य असल्यास घरामध्येचं रहा आणि शीत लहरींच्या संपर्कात येण्यापासून कमीतकमी प्रवास करा.
हाताची बोटे वेगळे असणाऱ्या हातमोजेपेक्षा अखंड असणारे हातमोजे (मिटन्स) घाला जे थंडीपासून बचाव करत अधिक उष्णता टिकवून ठेवतात.
वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
फुफ्फुसांचे संरक्षण करण्यासाठी तोंड झाकून ठेवा.
पाणी किंवा इतर उबदार पातळ पदार्थ प्या.
कॅफिनयुक्त द्रव पदार्थांचे सेवन टाळा.
आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत घ्या.
शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पेये प्या.
दारू पिणे टाळा.
रात्रीच्या वेळी गुरे, शेळी उघड्यावर ठेवू नका.
पशूंना गरम आणि उबदार ठिकाणी ठेवा.
20 तारखेपर्यंत थंडी राहणार
राज्यातील वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत असल्याचे दिसत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा फळपिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यात 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळं 20 तारखेपर्यंत थंडी राहणार आहे. त्यानंतर 21 तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार
पंजाबराव डखांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती पंजबाराव डख यांनी दिली आहे.