Bhandara : तीन दिवसांपासून भंडाऱ्यात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
तीन दिवसांपासून भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
Bhandara News : मागील तीन दिवसांपासून भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं या नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 15 गेट अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहेत. त्यातून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळं प्रशासनाने सर्वच्या सर्व 33 गेट सुरु करून सुमारे दीड लाखांहून अधिक क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाऊस थांबल्यानं 33 पैकी 31 गेट बंद करून दोन गेटमधून पाणी विसर्ग करण्यात येत होतो. आता परत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं गोसीखुर्द धरण प्रशासनानं गेट सुरू केले आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं आणि धापेवाडा बॅरेज चा विसर्ग वाढल्यानं गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील 9 तासात धरणातून टप्प्याटप्प्यानं पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
2020 मध्ये भंडारा जिल्ह्यात महापूरानं थैमान घातलं होतं. तेव्हापासून भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात भंडारा जिल्ह्यातील उपनद्या ज्यामध्ये सूर, देव्हाडी, बावणथडी, अंधारी, कथनी, गायमुख, आणि नागपूर जिल्ह्यातील कान्हण, खोब्रागडी या नदीच्या पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
राज्यातील काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसचे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: