(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय. तुरळक ठिकाणीच पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील 'या' भागात पावसाचा अंदाज
राज्यातील काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसचे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अद्यापही काही ठिकाणी पावसाची शक्यता
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्याठिकाणी धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. तर गोसे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा गोसे धरणाचे संपूर्ण 11 वक्रदार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. या 11 दरवाज्यातून 1 हजार 348.74 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असुन याचा फटका लगतच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसणार आहे. भंडारा शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम स्वरुपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळं जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे. सततच्या पावसामुळं प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क असून नदीकाठी असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, नदी नाले दुथडी भरुन लागले वाहू