Beed News : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवतीचा फास आवळला, विष्णू चाटेची फोर्ड गाडी केज पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या खंडणी प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपी विष्णू चाटेचे व्हाईस सँपल्स घेण्यात आले आहेत.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या विष्णू चाटे याची फोर्ड गाडी केज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आधी गुन्ह्यात वापरलेली काळी स्कॉर्पिओ आणि नंतर वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी पोलिसांना शरण आला ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. संतोष देशमुख हत्येला एक महिना पूर्ण होत असून पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची काळी स्कार्पिओ ताब्यात घेण्यात आली आहे. याच गाडीतून संतोष देशमुखचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं. नंतर त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. नंतर वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आाल ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी जप्त केली. आता विष्णू चाटे याची फोर्ड गाडीही केज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणातील आरोपीची जशी कसून चौकशी केली जाते त्याच पद्धतीने या आरोपींनी वापरलेल्या गाड्यासुद्धा पोलिस ताब्यात घेताना दिसत आहे.
शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर गाडी
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुणे येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. यासाठी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या MH 23 BG 2231 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर SIT ने कोर्टात दावा केला की, हीच गाडी वाल्मिक कराड यांनी फरार होताना वापरली आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी स्कार्पिओ गाडी जप्त करुन केज पोलीस ठाण्यात कव्हर टाकून झाकून ठेवण्यात आली आहे.
वायभसे दाम्पत्याची पुन्हा एकदा चौकशी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वेगाने तपास सुरू आहे. मंगळवारी सीआयडीकडून पुन्हा एकदा संभाजी वायभसे आणि त्यांची पत्नी सुरेखा वायभसेंची चौकशी करण्यात आली. हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या तपासासंदर्भात वायभसे दाम्पत्याची चौकशी झाल्याचा अंदाज आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळेंना शोधण्यातही वायबसे दाम्पत्याची माहिती महत्त्वाची ठरली होती.
विष्णू चाटेचे व्हाईस सँपल घेतले
आवादा एनर्जी या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप, विष्णू चाटेवर आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटेचे व्हॉईस सँपल्स घेतले आहेत. विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही तपास सध्या सुरू आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत.
बीडमधील 76 परवाने रद्द केले
ही कारवाई सुरू असतानाच बीड जिल्ह्यात वाटलेल्या शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत 76 परवाने रद्द करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा समोर आला होता. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
ही बातमी वाचा: