VIDEO Sarangi Mahajan : पंकजा-धनंजयने जमीन हडपली, वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली; प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप
Santosh Deshmukh Murder Case : कोऱ्या कागदावर सह्या केल्या नाही तर परळीतून बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशी धमकी वाल्मिक कराडच्या माणसांनी दिल्याचा आरोप प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला.
बीड : एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहकारी अडकल्याने अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा गोत्यात येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपली जमीन धमकी देऊन हडपल्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी ही जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला. महत्त्वाचं म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी जवळपास महिनाआधीच त्यांनी आरोप केला होता. सारंगी महाजन याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
साडेतीन कोटींची जमीन ही धमकी देऊन फक्त 21 लाखांना घेतली. परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. सही केल्याशिवाय परळीतून बाहेर जाऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकीही दिल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. यामध्ये सारंगी महाजन यांनी वाल्मिक कराडचेही नाव घेतलं आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते.
धनंजय मुंडेंच्या नोकराच्या नावे जमीन
सारंगी महाजन म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडे याने धाक दाखवून जमिनीची रजिस्ट्री केली. जोपर्यंत सह्या करत नाही तोपर्यंत परळीतून जाऊ दिले जाणार नाही अशी त्याने धमकी दिली. प्रवीण महाजन जाऊन दहा वर्ष झाले तरी ही आमच्या जमिनीवर डोळा आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नंतर विसार पावती मला पाठवली. धनंजय मुंडे यांच्या घरी नोकर आहे त्याच्या नावावर ही जमीन करण्यात आली.
नंतर समजलं की चोराकडेच आलेय
साडेतीन करोड रुपयांची जमीन फक्त 21 लाखात घेतली. तीन दिवसांत सातबाराही त्यांनी बदलला. ती जमीन गोविंद मुंडे, त्याची सून आणि दशरथ साठे यांच्या नावावर केली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांना मी भेटले. त्यानंतर ते टाळाटाळ करायला लागले. मामी, तुझा फॉलोअप कमी पडला असं त्यांनी मला सांगितलं. मी धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्यावेळी तो म्हणाला की मामी काळजी करु नको. परळीत कुठलीही जमीन विकली तर ती मला कळते. नंतर कळलं की मी चोराकडेच आलेय.
वाल्मिक कराडची माणसे
वाल्मिक कराडची कधी भेट झाली नाही, पण मला धमकवणारी माणसे ही वाल्मिक कराडची होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचाही हात आहे. या संदर्भात अजित पवार आणि शरद पवारांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घातला आहे. आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे.
ही बातमी वाचा: