Pankaja Munde : मी बुद्धाचा नाहीतर कृष्णाचा मार्ग अवलंबलाय, आता फक्त कर्म करायचंय; वाचा नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
मी सत्य आणि तत्वाचं राजकारण करत असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. मी आता बुद्धाचा मार्ग नाही तर श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबल्याचे मुंडे म्हणाल्या.
Pankaja Munde : चार वर्षाच्या काळात मी फक्त राजकीय दुःखच नाही तर खूप काही सहन केलं आहे. पण माझी नीतिमत्ता एवढी लेचीपेची नाही. सर्व काही सहन करत असताना मी माझं धैर्य ढळू दिलं नाही, मी सत्य आणि तत्वाचं राजकारण करत असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. सध्या महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही, पण आता मी रखरखत्यां रनात उतरल्याचे मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा (Shiv Shakti Yatra) बीड (Beed) जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. बीडच्या पाटोदा या ठिकाणी मुंडे यांच्या यात्रेचं आगमन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. मी आता बुद्धाचा मार्ग नाही तर श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबल्याचे मुंडे म्हणाल्या.
पाटोद्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडे यांचे स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी फुलाची उधळण देखील करण्यात आली. मी आता बुद्धाच्या मार्गावर नाही तर आता मी श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबला आहे. आता फक्त कर्म करायचे आहे. त्यामुळं मला फळाची कुठलीही अपेक्षा नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यापुढं जे काही करायचं ते जनतेसाठी करायचं. कारण जनताच माझं कर्म आणि माझा धर्म असल्याचे मुंडे म्हणाल्या.
मी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करत नाही
महाराष्ट्रात माझ्याकडे आता कुठलीच जबाबदारी नाही. पण मी रखरखत्या रनात उतरले आहे. अनेक कार्यकर्ते दररोज फोन लावून विचारतात ताई तुम्ही भेटायला का येत नाहीत. मात्र, महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही, त्यामुळं तुम्हाला भेटायला कसे येऊ? असा प्रश्न मला पडतो. पण आता देवदर्शनाच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले आहे. पक्षाने दिल्लीमध्ये जी जबाबदारी दिली होती, ती मध्य प्रदेशात मी चोखपणे पार पाडली. मी माझं काम करत आहे. दुसऱ्याच्या कोणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अशी भावनिक साद देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना घातली.
मुंडे साहेबांच्या नावाशिवाय आता माझी क्षमता मला सिद्ध करायचीय
मुंडेसाहेब आता आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांनी जर मला विचारलं की माझ्याशिवाय तू काय केलंस, त्यामुळे आता मुंडे साहेबांच्या नावाशिवाय मला माझी क्षमता सिद्ध करुन दाखवायची असल्याचे मुंडे म्हणाल्या. मला माझं कर्तृत्व सिद्ध करून काहीही मिळवायचे नाही हे सगळं जनतेसाठी करत आहे. मी निवडणुकीत एकदा हरले तर त्याचा काही लोकांनी खूप मोठा इशू केला. निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते. मुंडे साहेब देखील एकदा पराभूत झाले होते. माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच कळलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
Pankaja Munde : मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी, त्यांच्या पुढची आहे का हे काळच ठरवेल; पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य