Pankaja Munde : मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी, त्यांच्या पुढची आहे का हे काळच ठरवेल; पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य
Pankaja Munde : आपल्याला महाराष्ट्रात कोणतीच महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही म्हणून मध्य प्रदेशमध्ये काम करतोय अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
सोलापूर : मी मुंडे साहेबांच्यापेक्षा वेगळी असून मी त्यांच्या पुढची आहे का हे काळच ठरवेल असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे. परळीचा पुढचा आमदार कोण असेल हा निर्णय ज्यांनी प्रॉब्लेम तयार केला आहे तेच घेतील अशा शब्दात त्यांनी भाजपबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिव-शक्ती परिक्रमा (ShivaShakti Parikrama) यात्रा सुरू केली असून त्यादरम्यान त्यांनी संवाद साधला. भाजपबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी कोणताही वेडावाकडा शब्द तोंडून जाणार नाही याची जरी खबरदारी घेतली असली तरीही त्यांची नाराजी चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
आज पंकजा मुंडे या त्यांच्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात आल्या. यावेळी त्यांचे अतिशय जल्लोषात आणि फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले. यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत ओबीसी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याला जाईल तिथे असाच उदंड प्रतिसाद मिळत असून माझ्यासोबत केवळ मोजके कार्यकर्ते आणि 10 गाड्या आहेत, पण जाईल तिथे शेकडो गाड्या आमच्या यात्रेत सामील होतात असे त्यांनी सांगितले. हे मी शक्तिप्रदर्शन करीत नसले तरी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाईल तेथे सामील होतात, एवढे प्रेम जनता माझ्यावर करते असंही त्या म्हणाल्या.
आपण संघाच्या मुशीत तयार झालेलो असून आपल्याला प्रवेशासाठी कोणी साद घालत असले तरी मला काय करायचे आहे हे मला नक्की माहीत आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्याला महाराष्ट्रात कोणतीच जबाबदारी दिली नसल्याने मध्य प्रदेशमध्ये दिलेली जबाबदारी पार पाडत असल्याची खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
मराठा आणि ओबीसी या विषयावर बोलणे टाळताना यावर आपली भूमिका पहिल्यापासून कायम असल्याचे त्यांनी सांगितले. या शिव-शक्ती परिक्रमेच्या दरम्यान गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आल्या होत्या. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे, शंकुतला नडगिरे, नगरसेवक नवनाथ रानगट, गुरुदास अभ्यंकर यासह अनेक लोक उपस्थित होते. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी त्यांचे स्वागत करीत मंदिर समितीच्या वतीने सन्मान केला .
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याला ‘शिव-शक्ती परिक्रमा’ असे नाव देण्यात आले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय ऊर्जेसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे 12 जिल्ह्यांचा दौरा करतील. यावेळी त्या विविध मंदिरांना भेटी देतील आणि पक्षाच्या सदस्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील. ‘शिव-शक्ती परिक्रमा’ मुख्य दौरा 4 सप्टेंबरला रोजी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर पासून सुरू झाला. या दौऱ्याचा समारोप 11 तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत. प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत.
ही बातमी वाचा: