Beed : अंबाजोगाई शहरात तब्बल 12 दिवसाआड पाणीपुरवठा; सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती
Beed Water Issues : अंबाजोगाई शहरामध्ये रमजान महिन्याच्या काळातच नगरपरिषदे कडून 12 ते 14 दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Beed Water Issues : यंदा राज्यात दुष्काळ पडण्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच, आता मराठवाड्यातील काही भागात पाणी टंचाई (Water Issues) जाणवू लागली आहे. कारण बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाई शहरामध्ये रमजान महिन्याच्या काळातच नगरपरिषदेकडून 12 ते 14 दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत, तर दुसरीकडे रमजान महिना सुरु असून अंबाजोगाई शहरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तब्बल 12 ते 14 दिवसांनी शहराला पाणी मिळत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अंबाजोगाई शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा यंत्रणेत तांत्रिक बिघाड होत असल्याने पाण्याचा नियोजन पूर्णपणे कोलमडून गेल आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासीयांना 12 ते 14 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात होत असलेला पाणीपुरवठाही अत्यंत अपुरा आणि कमी दाबाने होत असल्याने शहरवासीयांची ऐन सणासुदीत तारांबळ उडाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आधीच उन्हाचे चटके जाणवत असून, पाण्याची मागणी देखील वाढली आहे. अशात वाढीव पाणी सोडा नियोजित पाण्यासाठी देखील नागरिकांना 12 ते 14 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. दरम्यानच्या काळात खाजगी टँकरने पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे मे महिना अजून बाकी असतानाच एप्रिलमध्येच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती
अंबाजोगाई शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पण गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाई शहराला होणारा पाणीपुरवठा पाहता नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अंबाजोगाईकरांना महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा पाणीपुरवठा होतो, म्हणजेच आठवड्यातून एकदाच नळाला पाणी येते. पण आता तर थेट 12 दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन-दोन आठवडा पाणी येत नसल्याने शहरवासीयांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती...
सद्या सणासुदीचा काळ असून, मुस्लिमांचा रमजान महिना सुरु आहे. अशात दिवसभर उपवास असताना देखील मुस्लीम बांधवाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर खाजगी टँकरवाल्यांनी देखील आपले दर वाढवल्याने याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. विशेष म्हणजे आज घडीला धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून देखील सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :