Ajit Pawar: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सगळीकडे पोहचू शकत नाही; तत्काळ मंत्रिमंडळ स्थापन करा: अजित पवार
Beed News: महाराष्ट्र राज्य मोठे राज्य असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळीकडे पोहचू शकत नसल्याचं अजित पवार म्हणाले.
Beed News: मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यावर असलेले विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर मंत्रीमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कितीही कर्तबगार असले तरीही ते सगळीकडे पोहोचू शकत नाहीत, आपले राज्य मोठे असून, पालकमंत्र्यांच्या घोषणा कराव्यात अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, राज्यातील समस्या वेगवेगळ्या आहेत. लोकांना मदत कशी करता येईल हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. एक महिना पूर्ण झालेला आहे. आता वाटतंय या दोन-चार दिवसांमध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
ईडी संदर्भात संजय राऊत बोलतील
ईडी संदर्भात अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग आयटी असेल, इडी असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल, सीआयडी असेल, पोलीस क्राईम ब्रँच असेल. या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा सारखा सारखा का येते त्या संदर्भात जास्त राऊत साहेब सांगतील असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून नुकसानीची पाहणी...
विरोधीपक्ष नेते अजित पावर सद्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. शनिवारी त्यांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी केली. तर आज ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तर राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करून, तत्काळ विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सुद्धा अजित पवार यांनी केली आहे.