मोठी बातमी : पुण्यावरुन लग्नाला जाताना चारचाकी वाहून गेली, एकाचा मृत्यू, तिघांना वाचवलं
लिंगी नदीवरील पुलावर कार वाहून गेल्याचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले होते.

बीड : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून बीड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या, नाले भरुन वाहत आहेत. नद्यांवरील पुलावरूनही पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, परळीत एक दुर्घटना घडली असून पुण्याहून दिग्रसकडे लग्न समारंभासाठी जात असलेली कार पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. परळी (Beed) तालुक्याच्या कवडगाव हुडा शिवारातील तेलसमुख रोडवर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मात्र, या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने कारचालकाने थेट पुलावरुन कार पाण्यात घातली. मात्र, दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात ही कार वाहून गेली.
लिंगी नदीवरील पुलावर कार वाहून गेल्याचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले होते. त्यानुसार, कारमधून वाहून गेलेल्या चौघांना वाचवण्यासाठी 12 तास बचाव कार्य राबविले होते. त्यामध्ये वाहून गेलेल्या अमर पोळ, राहुल पोळ, राहुल नवले या तिघांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील विशाल बल्लाळ हा तरुण बेपत्ता होता, शोधमोहिमेनंतर आता तो मयत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून त्याचा मृतदेह लिंगी नदीच्या पुलापासून 2 किमी दूर सापडला आहे. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सरस्वती नदी खळखळून वाहिली
बीडसह परळी तालुक्यातही शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सरस्वती नदीला पाणी आले आहे. त्याचबरोबर जिरेवाडी नदीच्या पात्रातूनही पाणी वाहू लागले आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली, दुपारी चार वाजेपर्यंत पाऊस सुरू होताच शहर व परिसरातील नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. शहरातील आझाद चौक ते पंचायत समिती कार्यालया रस्त्यावर साचले होते. नालीतील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती. परळी शहरातील आंबेवेस भागातून वाहणारी सरस्वती नदी शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली. नदी-नाल्यांना पूर आला असून सरस्वती नदीने उग्र रूप धारण केले आहे, नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.























