Beed News : सरकारने कितीही दबाव आणला तरी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच, रविकांत तुपकर यांचा पुनरुच्चार
Beed News : "सरकारने कितीही दबाव आणला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच," असा पुनरुच्चार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.
Beed News : "सरकारने कितीही दबाव आणला तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच," असा पुनरुच्चार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला. यामुळे जीव गेला तरी हे आंदोलन मागे घेणार नसल्याचं तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत बीडच्या (Beed) जवळबन गावात सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा घेण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले असल्याचा आरोप तुपकर यांनी यावेळी आपल्या भाषणातून केला. तर 24 तारखेला होणाऱ्या जलसमाधी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन तुपकर यांनी केलं आहे.
सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांचा आंदोलनाचा इशारा
सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. सरकारने सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात 24 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली आहे. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस
तत्पूर्वी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली 6 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू, असा इशारा दिला होता. तसंच शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांना नोटीस दिली. अरबी समुद्रात होणारं जलसमाधी आंदोलन थांबवा अन्यथा कारवाई करु, असा इशारा नोटीसमध्ये तुपकर यांना दिला होता. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी मध्यरात्री 12 वाजता तुपकर यांच्या निवासस्थानी जाऊन नोटीस दिली होती. परंतु या नोटीसनंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
Ravikant Tupkar Beed:अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार, बीडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मेळावा
संबंधित बातमी