Beed News : ...तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल; पटसंख्येमुळे बंद होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पटसंख्येमुळे बंद होणाऱ्या बीडमधील शाळेतील विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे. "माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा होऊन ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन," असं त्याने म्हटलं आहे.
Beed News : 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याने गावातील जिल्हा परिषदेच्या (ZP School) प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपली शाळा बंद होणार असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगताच चौथी इयत्तेत शिकणाऱ्या बीडमधील (Beed) विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आणि आपली कैफियत मांडली. "माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा होऊन ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन," असं या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी विद्यार्थी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बीड जिल्ह्यातील जायभायवाडी हे गाव डोंगर भागात आहे. ऊस तोडणी करणाऱ्यांचे गाव अशी गावाची ओळख. परंतु पटसंख्या कमी असल्याने इथली जिल्हा परिषद शाळा बंद केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळा बंद होणार असं सांगतात या शाळेतील समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या भावना मांडल्या.
आपले गाव जायभायवाडी हे डोंगरातलं गाव. या गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आसल्याने विद्यार्थ्याची शिक्षणाची सोय होते. गावातून इतर ठिकाणी जायचं म्हटलं तर पाच ते सात किमी चालत डोंगर चढउतार करत जावं लागतं. रस्त्याने असणारे ओढे पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी मोठा अडथळा ठरतात. आई-वडील सहा महिने ऊस तोडणीला जातात, अशा परिस्थितीत आम्ही शिकायचे कसे? की शिक्षणापासून आमची पिढी वंचित ठेवायची, असा सवाल या चौथीतील विद्यार्थ्याने विचारला आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी तरी शाळा सुरु ठेवावी, अशी विनंती देखील या पत्रातून केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पत्रानंतर तरी शिक्षण विभागाला पाझर फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय लिहिलं आहे पत्रात?
समाधान बाबासाहेब जायभाये
वर्ग 4 था
जि. प. प्रा. शा. जायभायवाडी ता धारुर. जी बीड.
प्रती
मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र
पत्र लिहिण्यास कारण की, आमचे सर म्हणाले की आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल, माझे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल. आणि मी सुद्धा मोठा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की माझी शाळा बंद करु नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागते. जाताना वाटेत आहे ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणी आहे आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दुसरीची मुले अज्ञात मुलं आम्ही कसे जायचे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की माझी बंद करु नका. माझं गाव डोंगराच्या कुशीत बसलेलं आहे
नाव. समाधान बाबासात जायभाये.
इतर महत्त्वाची बातमी