Car : भारतातील ऑटो बाजारपेठेतून आणखी एका ब्रॅण्डची एक्झिट
Datsun Car : भारतीय बाजारपेठेतून डॅटसन कारने एक्झिट घेतली आहे. ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जपानी कार कंपनी 'निस्सान' ही उपकंपनी होती.
Datsun Car : मागील काही वर्षात भारतीय बाजारपेठेतून नावाजलेल्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. आता भारतातून आणखी एका कारच्या ब्रॅण्डने गाशा गुंडाळला आहे. भारतीय बाजारपेठेतून डॅटसन (Datsun) ब्रॅण्डच्या कारने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील आघाडीची कार कंपनी निस्सानची Datsun कंपनी आहे. मागील काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू होते.
कमी किंमतीत कार खरेदी करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. याच ग्राहकांना लक्षात घेऊन बजेट कारची बाजारपेठ काबिज करण्यासाठी निस्सान कंपनीने आपला डॅटसन हा ब्रॅण्ड लाँच केला होता. डॅटसनकडून मारूती अल्टोला स्पर्धा निर्माण होईल असे म्हटले जात होते.
टाटा नॅनोप्रमाणे डॅटसन ब्रँड अयशस्वी झाला. डॅटसन कारने कमी किंमत ठेवली असली तरी ग्राहकांना आकर्षित करू शकले नाहीत. कारची कमी किंमत ठेवण्यासाठी खर्चात मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे फारसे फीचर्सही नव्हते. मारूतीसारख्या दिग्गज कंपनीला टक्कर देण्यासाठी आवश्यक पॅकेजिंगचा अभाव दिसून आल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
डॅटसन गो 2014 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि बजेट कार खरेदीदारांसाठी एक प्रशस्त छोटी कार बनवण्याची कल्पना होती. योग्य इंटीरियर, फीचर्स आणि दर्जा आदींबाबत तडजोड केल्याने या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला नाही.
Datsun Go+ ही कारदेखील भारतीय बाजारपेठेवर आपला प्रभाव पाडू शकली नाही. त्यानंतर डॅटसनने Redigo कडून अपेक्षा होत्या. मात्र, ही कार Renault Kiwd पेक्षाही कमी लोकप्रिय होती. त्यामुळे या कारलादेखील फारसा चांगला प्रतिसाद लाभला नाही. सुरक्षा चाचणीत कमी रेटिंग मिळणे अथवा मारूती सारखे नेटवर्क नसणे आदी कारणांचा फटका डॅटसनला फटका बसला असल्याचे म्हटले जाते.
डॅटसन ब्रॅण्डच्या कार बंद झाल्याने आता कंपनी निस्सानवर अधिक लक्ष केंद्रीत करणार. डॅटसनची कार असलेल्या ग्राहकांसाठी कारचे सुट्टे भाग आणि इतर सेवा पुरवली जाणार आहे.