BMW ने हायड्रोजन फ्युएल सेल कारसाठी टोयोटाशी केली हातमिळवणी, 2025 मध्ये येणार पहिली कार
Hydrogen Fuel Cell Car: हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार कार्बन उत्सर्जन मुक्त वाहतुकीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. फ्युएल सेल कार चालवायला कमी खर्च येतो.
Hydrogen Fuel Cell Car: हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार कार्बन उत्सर्जन मुक्त वाहतुकीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. फ्युएल सेल कार चालवायला कमी खर्च येतो. या कारचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी इंधन सेल तंत्रज्ञान अद्याप विकसित झालेले नाही. पण अनेक कार कंपन्या हे तंत्रज्ञान परवडणारे बनवण्यासाठी काम करत आहेत.
अलीकडेच, जर्मन कार निर्माता BMW ने इंधन सेल कार विकसित करण्यासाठी टोयोटासोबत भागीदारी जाहीर केली आहे. दोन्ही कंपन्या नवीन हायड्रोजन फ्युएल सेल कारवर काम करत आहेत. या भागीदारी अंतर्गत 2025 मध्ये पहिली इंधन सेल कार लॉन्च केली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.
बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने अलीकडे पत्रकार परिषदेत सांगितले की, बीएमडब्ल्यू आणि टोयोटा हायड्रोजन इंधन सेल वाहन प्रकल्पावर काम करत आहेत. ते म्हणाले की, बीएमडब्ल्यूने टोयोटाला आपला भागीदार म्हणून निवडले कारण कंपनी 1990 पासून या तंत्रज्ञानावर काम करत आहे. तसेच त्यांनी एक इंधन सेल कार देखील लॉन्च केली आहे. बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फ्युएल सेल तंत्रज्ञान मोठ्या एसयूव्ही आकाराच्या कारसाठी विशेषतः योग्य आहे. लहान कारसाठी इंधन सेल तंत्रज्ञान विकसित करणे अधिक कठीण आहे. त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे, असेही ते म्हणाले.
BMW ने अलीकडेच 2021 म्युनिक मोटर शोमध्ये आपली पहिली हायड्रोजन-चालित इंधन सेल कार, iX5, प्रदर्शित केली. कंपनी या कारच्या काही युनिट्सची निर्मिती करण्याचीही तयारी करत आहे. इंधन सेल वाहने इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा खूपच चांगले असल्याचे सिद्ध होऊ शकते. इंधन सेल वाहने कोणत्याही प्रकारचे उत्सर्जन निर्माण करत नाहीत. तसेच त्यात इंधन भरणे देखील खूप सोपे आहे. इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी खूप वेळ घेते, हायड्रोजन इंधन सेल वाहने काही मिनिटांत इंधन भरतात.
दरम्यान, टोयोटाने स्वतःची इंधन सेल कार देखील विकसित केली आहे. टोयोटा मिराई ही ब्रँडची पहिली इंधन सेल कार आहे. ही कार भारतातही लॉन्च करण्यात आली आहे परंतु कंपनी तिचे व्यावसायिक उत्पादन करत नाही. BMW iX5 Hydrogen बद्दल बोलायचे झाले तर, ही कार फुल टँक हायड्रोजनवर 500 किमीची रेंज देऊ शकते. या कारमध्ये 6 किलो वजनाची हायड्रोजन टाकी बसवण्यात आली आहे.