(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Water: मराठवाड्यातील प्रकल्पांत 40 टक्केच पाणी, महिन्याभरात 11 टक्के पाण्याची घट
उन्हाळा संपत आला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा सुद्धा कमी होताना पाहायला मिळत आहे.
Marathwada Water: गेल्या महिन्याभरातील उन्हाचा पारा वाढताना पाहायला मिळाला, यामुळे झालेल्या बाष्पीभवनाचा फटका मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या जलप्रकल्पांना बसला आहे. धरणांतील पाणीपातळी 51 टक्क्यावरून 40 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे महिन्याभरात 11 टक्के पाण्याची घट झाली आहे. अनेक भागात पाणी टंचाई जाणवत आहे. तर गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी प्रकल्पांतील पाणी कमी झाले आहे.
मराठवाड्याच्या विचार केला तर विभागात एकूण 749 लघु प्रकल्पांपैकी 6 हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, 55 प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 47.87 टक्के पाणी साठा आहे. तसेच 75 मध्यम प्रकल्पात 33.02 टक्के, 749 लघु प्रकल्पात 22.62 टक्के, गोदावरीवरील 15 प्रकल्पात 37.41 टक्के, इतर बंधारे 25 प्रकल्पात 69.38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणीसाठा असा झाला कमी...
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीच धरण समजल्या जाणाऱ्या जायकवाडी ( jayakwadi) धरणाचा पाणीसाठा 56 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर आला आहे. ज्यात 1.23 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. तसेच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा 45 वरून 33 टक्क्यांवर आला आहे. लघु प्रकल्पात पाणीसाठी 31 वरून 23 टक्क्यांवर आला आहे. तर गोदावरी बंधाऱ्यात 47 वरून 37 आणि इतर बंधाऱ्यात 89 वरून 69 वर जलसाठा आला आहे.
पाणी टंचाई
मराठवाड्यातील जलसाठ्यातील पाणी कमी होत असताना विभागात पाणी टंचाई सुद्धा जाणवत आहे. मराठवाडय़ात 43 गाव आणि 23 वाड्यांवर एकूण 59 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 16 शासकीय आणि 43 खाजगी टँकरचा समावेश आहे. सर्वाधिक 25 टँकर जालना जिल्ह्यात सुरु आहे. तर हिंगोली जिल्ह्यात 19 , नांदेड 10, बीड 3, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 1 टँकर सुरु असल्याचे चित्र आहे. तर अनेक ठिकाणी टँकरची मागणी करण्यात अली असून प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात हा आकडा आणखी वाढू शकतो.