Weather Update: औरंगाबादमध्ये गारवा वाढला, सकाळपासून ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांचीही चिंता वाढली
Aurangabad Weather Update: वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे शेतकरी देखील संकटात सापडला आहे.

Aurangabad Weather Update: औरंगाबाद शहर (Aurangabad City) आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गायब असलेली थंडी (Cold Weather) पुन्हा जाणवू लागली आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात बुधवारी तापमानाचा पारा हा 11.5 अंश सेल्सिअसवर पोचला होता, तर आज सकाळी तापमानाचा पारा 18 अंश सेल्सिअस होता. मात्र सकाळपासून जोरदार वारा सुरु असल्याने थंडी अधिक जाणवत आहे. तर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, सूर्यदर्शन झालेले नाही.
ध्रुवीय वारे दक्षिणकडे सरकले आणि हिंदी महासागर, अरबी समुद्राकडे वाहणारे बाष्प महाराष्ट्रात आल्यामुळे सर्वत्र धुके आणि व्हिजिबिलिटी कमी झाल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. अजून दोन ते तीन दिवस अशाच प्रकारे गारठा राहणार असल्याचेही ते म्हणाले. सोबतच उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता देखील औंधकर यांनी व्यक्त केली आहे.
वातावरणात बदल...
औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडीचा चढ-उतार सुरु होता. त्यातच कालपासून काही भागात थंड वाऱ्यासह थंडी जाणवत आहे. बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत असेच वातावरण होते. आज सकाळी देखील पुन्हा वाऱ्यासह थंडी जाणवत आहे. वाढलेल्या गारठ्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. तर गारठा वाढला असला तरी वातावरणातील उष्णता अजूनही कायम आहे. औरंगाबादेत बुधवारी किमान 11.5 अंश तर कमाल 26.5 अंश सेल्सिअस तापमान होते. हे वातावरण अजून एक ते दोन दिवस तसेच राहणार आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सर्वांनी उबदार कपडे आणि शेकोटीची मदत घ्यावी, असे आवाहन हवामान अभ्यासक औंधकर यांनी केले.
आजाराचे प्रमाण वाढले...
कधी दिवसभर प्रचंड गरमागरम वातावरण तर कधी अचानक थंडी आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे याचे परिणाम माणसांवर देखील होत आहे. सर्दी,खोकला,ताप असे लक्षणे जाणवत असल्याने रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर याच बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. तर लहान बालकांना देखील याचा फटका बसत असून, आजारी पडणाऱ्यांचा संख्येत बालकांचा अधिक समावेश असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
सध्या शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. आधी खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातून सगळं काही गेले असतांना, रब्बीवर आर्थिक गणित अवलंबून आहे. मात्र असे असतानाच वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. थंडी कमी जास्त होत असल्याने याचा फटका गव्हाचा पिकाला बसत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे देखील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सोबतच याच फटका फळ बागांना देखील बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
