सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून दररोज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला जातो
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी घोषणा झालेल्या हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा (Vidhansabha) निवडणुकाचे निकाल आज घोषित झाले. या निकालात भाजपने पुन्हा एकदा हरियाणामध्ये बहुमताचे सरकार स्थापन केले असून जम्मू काश्मीरमध्येही भाजपला चांगले यश मिळालं आहे. त्यामुळे, भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास बळावला असून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्येही असाच निकाल लागेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) या निकालावर आनंद व्यक करताना हरियाणातील (Haryana) जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवल्याचे म्हटले. यावेळी, नाव न घेता त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून दररोज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला जातो. दैनिक घडामोडी व नेतेमंडळींच्या वक्तव्यावरुन ते भाजप व शिवसेना शिंदे गटाला लक्ष्य करत असतात. हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळेच, येथील निवडणुकांत भाजपचा पराभव झाला असता, तर संजय राऊतांनी त्यांच्यास्टाईलने टीका केली असते. त्यावरुनच, आता निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याच विरोधी पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती, आम्हाला फेक नेरेटीव्हने हरवलं. पण, फेक नरेटिव्हचे उत्तर आता थेट नरेटिव्हने दिले आहे. सकाळी 9 चा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता, काय बोलू आणि काय नको, त्यांना विचारावंसं वाटतंय आता कसं वाटतंय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधींना दुसरी सलामा महाराष्ट्र देणार
हरियाणात मागच्या निवडणुकीत आपल्याला 40 जागा मिळाल्या होत्या, यावेळी आपण सर्व रेकॉर्ड तोडले 50 जागा मिळाल्या आहेत. 60 वर्षानंतर कोणतातरी पक्ष सलग तीन वेळा विधानसभा निवडणुका जिंकत आहे. येथील निवडणुकांत राजकारण करताना खेळाडूंना घेऊन रान पेटवण्यात आले, पण या सर्वांना मतदारांनी नाकारले, देशातली जनता मोदींच्या पाठीशी आहे. राहुल बाबा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर नाटक आणि नौटकी करत आहेत, राहुल गांधी यांना पहिली सलामी हरियाणाने दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकांतही महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
जम्मू काश्मीरमध्ये मिळालेलं समर्थन महत्त्वाचं
जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली, जम्मूमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. पाकिस्तान जे सांगत होते, जम्मू काश्मीर भारतात नाही, पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आम्ही घेतली. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कुणाचे बनतं हे महत्वाचे नाही, दोन्ही राज्यात ज्या पद्धतीने जनतेने समर्थन दिले ते महत्वाचे आहे. या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिला आहे. फेक नरेटिव्हवर एखादी निवडणूक जिंकता येते, पण काम करुन वारंवार निवडणूक जिंकता येते, असेही फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?