अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी डांबून केला अत्याचार, न्यायालयाने सुनावली वीस वर्षे सक्तमजुरी
Aurangabad : आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी वीस हजार रुपये पीडितेला पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Aurangabad Crime News: अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी डांबून ठेवत, धमकी देत तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी वीस वर्षे सक्तमजुरी व दंड आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदाराला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा (Hard Labour) ठोठावली. तर आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी वीस हजार रुपये पीडितेला पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. निल उर्फ नंदू शेषराव शेलार असे मुख्य आरोपीचे नाव असून, प्रकाश रतन सास्ते असे गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन पीडितेने पुंडलिकनगर पोलिसात फिर्याद दिली होती की, 27 मार्च 2019 रोजी सकाळी दहाच्या सुमारास पीडिता गल्लीत उभी असताना तिच्या ओळखीचा अनिल ऊर्फ नंदू शेलार तेथे आला आणि तुला काही सांगायचे आहे, असे म्हणत पीडितेला आपला मित्र प्रकाश सास्ते याच्या घरी आणले. त्यानंतर पीडितेला घरात बोलावून दरवाजा बंद केला. तर मला काही काम आहे, ते मी करून येतो असे म्हणत पीडितेला घरात बंद करून तेथून निघून गेला. पीडिताला घरात कोंडून ठेवल्यावर आरोपी सायंकाळी जेवण घेऊन आला. त्याच्यासोबत त्याचा मित्र प्रकाश सास्ते देखील तेथे आला होता. दरम्यान यावेळी पीडितेने आरोपीकडे विचारणा केली असता, त्याने तू चूपचाप येथे राहा, नाहीतर तुला माहीत आहे, मी कसा आहे, तुला सोडणार नाही, असे म्हणत पीडितेला दोन दिवस त्याच खोलीत डांबून ठेवले.
दारू पेऊन केला अत्याचार...
दरम्यान पीडिताला एका खोलीत कोंडून ठेवल्यावर 4 एप्रिल 2019 रोजी आरोपी दुपारच्या सुमारास दारू पिऊन आला. आधी मुलीला जेवण दिलं आणि त्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यानंतर देखील मुलीला डांबून ठेवले. मात्र 7 एप्रिल 2019 रोजी आरोपी एका लग्नाला गेला, त्यावेळी त्याचा मित्र प्रकाशने पीडितेला, तुला घरी जायचे तर जा, मी काहीही म्हणणार नाही, असे म्हणाला, त्यानंतर पीडितेची सुटका झाली. पुढे मुलीने या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला.
वीस वर्षांची सक्तमजुरी...
प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक महादेव पुरी यांनी दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला विविध कलमाखाली वीस वर्षे सक्तमजुरी व दंड आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे.