Amravati News : खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता
Amravati News : युनियन बँकेतील सोन्याच्या दागिन्यांसह गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर बँकेने तातडीने आपल्या स्तरावर सर्व तारण कर्जाचे ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे.
Amravati News Update : अमरावती येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेतील तीन कोटी रूपये किमतीचे सोने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. राजापेठ शाखेतील 92 पैकी 59 खातेदारांचे तारण ठेवलेले तीन कोटीचे 5 किलो 800 ग्रॅम सोने लंपास करून त्या ठिकाणी नकली दागिने ठेवण्यात आल्याचे प्रकरण राजापेठ पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे खातेधारक आपल्या लॉकर मधील सोने सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी बॅंकेत गर्दी करत आहेत. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
अमरावतीचे उज्वल मळसने यांनी राजापेठ येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गहाण ठेवलेल्या शंभर ग्रॅम सोन्याच्या दागिन्याऐवजी बनावट सोन्याचे दागिने देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर आणखी एक तक्रार पोलिसांकडे आली. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी बँक व्यवस्थापनाला नोटीस बजावून याप्रकरणी अहवाल मागितला होता. बँक व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या विविध 92 पैकी 59 खातेदारांचे तारण ठेवलेले पाच किलो 800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये छेडछाड केल्याचे मान्य करण्यात आले आहे. या तारण कर्जाच्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या खर्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही चूक बँक व्यवस्थापनाने मान्य केल्याने बँकेच्या तारण धारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राजापेठ पोलिसांनी युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतील अधिकारी, कर्मचार्यांविरुद्ध आलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला होता. बँक व्यवस्थापनाने सध्या कोणाचीही जबाबदारी निश्चित केलेली नाही. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्या बँकेच्या स्ट्राँग रूममध्ये असलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले खरे सोने केव्हा आणि कसे गायब झाले आणि तेथे बनावट सोन्याचे दागिने कोणी आणले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पोलीस देखील आता याच मार्गाने तपास करत आहेत.
युनियन बँकेतील सोन्याच्या दागिन्यांसह गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर बँकेने तातडीने आपल्या स्तरावर सर्व तारण कर्जाचे ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील दोषी समोर आणले जातील असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या