Chandrapur News : जुगारात जिंकणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करुन 50 लाखांच्या खंडणीची मागणी, तिघांना अटक
Chandrapur News : जुगारात जिंकणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली असून दोन आरोपी पसार झाले आहेत.
Chandrapur News : जुगारात (Gambling) जिंकणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण (Kidnap) करुन 50 लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस झाला आहे. मुख्य म्हणजे जुगारात हरणारा आरोपी सरताज हाफिज याने या प्रकरणात स्वतःचं देखील अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली असून दोन आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
प्रदीप गंगमवार, राजेश झाडे आणि सरताज हाफिज हे तिघे नेहमीच्या सवयीप्रमाणे 15 ऑगस्टच्या दुपारी चंद्रपूर शहराचा मध्यवर्ती असलेला हनुमान नगर परिसरात जुगार खेळायला आले होते. मात्र अचानक बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून चार जणांनी त्यांचं अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी प्रदीप गंगमवार यांच्याकडून तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गंगमवार यांनी 50 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु पैसे 16 ऑगस्टला मिळतील असं सांगिचल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना नागपूरच्या मोमीनपुरा भागात नेलं.
वाटेत चारपैकी एक आरोपी सिगरेट पिण्यासाठी एक आरोपी गाडी खाली उतरला. गाडी अनलॉक असल्याचं समजताच प्रदीप गंगमवार आणि राजेश झाडे यांनी आरडाओरड करुन स्वतःची सुटका केली. यावेळी आरोपींनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अपहरणाचा कट फसला अस वाटत असताना आरोपींनी तिथून पळ काढला. अपहरण करणाऱ्या आरोपींसोबत सरताज हाफिज देखील फरार झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सरताजचा माग काढला आणि तेलंगणात पळून जाताना कोरपना इथे त्याला त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली. आणि त्याच्या अटकेतून समोर आली अपहरणनाट्याची अचंबित करणारी कहाणी.
प्रदीप गंगमवार याने मागील काही दिवसात सरताज हाफिजकडून मोठी रक्कम जुगारात जिंकली होती आणि हीच रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने नागपुरातील चार साथीदारांच्या मदतीने हे अपहरण नाट्य रचले आणि स्वतःचे देखील अपहरण झाल्याचा बनाव रचला. प्रदीप गंगमवार यांच्या तक्रारीवरुन सरताज हाफिज याच्यासह त्याचे दोन साथीदार शेख नूर आणि अजय गौर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे प्रकरण चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलं आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे चंद्रपुरात गुन्हेगारी आणि जुगाराचं जाळं किती पसरलं आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.