Amravati News : स्वागत कमानीचा वाद विकोपाला; अनेकांनी सोडले गाव, तोडगा न निघाल्यास थेट गाठणार मुंबई
Amravati News:अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Amravati News अमरावती : गावातील प्रवेशद्वाराच्या नामांतराचा वाद विकोपाला जाऊन गावातील शेकडो ग्रामस्थांनी गाव सोडल्याची बाब समोर आली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर (Amravati News) येथील स्वागत प्रवेशद्वाराला 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार' असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्धबांधवांनी केली होती. परंतु याला गावातील काही इतर समाजबांधवांनी विरोध दर्शविल्याने गावामध्ये दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्णम झाले.
आपल्या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने बौद्धबांधवांनी आज सकाळी गाव सोडून अमरावती (Amravati) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मात्र, या भेटीत जिल्हा प्रशासनाने जर कुठलीही ठोस पाऊले उचलेल नाहीत, तर हजारोंच्या संख्येने मुंबई गाठून दाद मागण्याचा आक्रमक पवित्रा पांढरी खानमपूर गावातील बौद्धबांधवांनी घेतला आहे. परिणामी गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला
पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 2020 ला ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल, असा ठराव पारित झाला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर 26 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही, असाही ठराव पारित करण्यात आला होता. मात्र, बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावण्यात आले. त्याला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असता हा फलक 13 फेब्रुवारीला पोलीसांनी तो काढण्याचा प्रयत्न केला. याला गावातील शेकडो बौद्धबांधवांनी विरोध दर्शवत गावाच्या प्रवेशद्वारावरच आळी पाळीने ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, 22 फेब्रुवारीला प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला शामियाना टाकून हजारो नागरिकांनीं विरोध दर्शवत ही लोखंडी कमान काढून योग्य बांधकाम करावे अशी मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही गट आमने सामने ठिय्या आंदोलनाला बसल्याने गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, 6 मार्चला ग्रामसभा घेऊन या वाद मिटवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेण्याचे ठरले. मात्र, काही गावकऱ्यांनी ही ग्रामसभाच अवैध असल्याचं सांगत विरोध दर्शवला आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
गावात संचारबंदी लागू
गावात सामाजिक सलोखा कायम राहावा, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत काल सायंकाळी दर्यापूर येथे लेखी पत्र देत आश्वासन दिले. मात्र, आपल्या मागणीसाठी गावातील शेकडो बौद्धबांधवांनी गाव सोडून बुधवारी मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पांढरी खानमपूर गावात कायदा आणि सुव्यवस्था बिगडू नये यासाठी गावामध्ये 8 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.