(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमरावतीच्या मुख्य बाजारातील जुनी इमारत कोसळली, पाच जणांचा मृत्यू
Amravati Building Collapse : अमरावती शहरातील मुख्य बाजारातील जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली.
Amravati Building Collapse : अमरावती शहरातील मुख्य बाजारातील जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी मुख्य बाजारातील एक जुनी इमारात दुपारी दीड वाजता अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला इमारतीत सहा ते सात जण दबल्या गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. इमारत खूप जुनी आणि जीर्ण झाली होती. महानगरपालिका प्रशासनाने चार वेळा नोटीस बजावली. वरचा मजला ज्याठिकाणी लॉज होता, तो बंद करण्यात आला होता. पण खालच्या मजल्यावर तीन दुकानं सुरू होती. राजदीप बॅग हाऊस मध्ये सिलिंगचं काम सुरू होतं. यासाठी चार मजूर काम करत होते आणि दुकान मालक त्याठिकाणी होते. पण अचानक पूर्ण बिल्डिंगचं सिलिंग आणि वरचा मजला कोसळला ज्यामध्ये पाच जणांचा दुर्देवाने यात मृत्यू झाला.
अमरावती शहरातील प्रभात टॉकीजजवळ आज ही दुमजली जुनी इमारत कोसळली. ही इमारत शहरातील मुख्य बाजारात होती आणि खूप जुनी, जीर्ण होती. बऱ्याच दिवसांपासून वरच्या मजल्याचा वापर बंद होता. खालच्या मजल्यावर तीन ते चार दुकाने होती. इमारत कोसळण्याचा धोका फार पूर्वीपासून होता. महानगरपालिकेने यापूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. भाड्याने घेतलेल्या जागेत परवानगीशिवाय दुरुस्तीचे काम करून घेत होते अशी माहिती मिळाली आहे. आज दुपारी ही इमारत अचानक कोसळल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. यावेळी पाच जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो.. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन याची पूर्ण चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत -
अमरावती येथे एक जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जखमी आहेत. मलबा हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्हाधिकार्यांशी मी संपर्कात आहे. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. या घटनेत प्राण गमवावे लागलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ