(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP : कोणाचा करेक्ट कार्यक्रम ? जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांची गुप्त भेट? मिटकरी म्हणतात...
NCP Jayant Patil Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली असताना दुसरीकडे जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा सुरू आहे .अमोल मिटकरी यांनीदेखील सूचक वक्तव्य केले.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घडाळ्यावर दावा केला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे. अशा चर्चेला पुन्हा एकदा उधाण आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गुप्त भेट झाली असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे मिटकरी यांनी ही बाब पूर्णपणे नाकारली देखील नाही.
निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आणि मूळ पक्षाचा वाद सुरू आहे. या सुनावणीत शरद पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप अजित पवार गटाकडून नोंदवण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे शरद पवार हे पक्ष बांधण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. एका बाजूला ही स्थिती असताना दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची मनधरणी सुरू आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील आणि मिटकरी यांची गुप्त भेट
अकोल्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अकोल्यात शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर एका गुप्त ठिकाणी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चर्चेचा नेमका तपशील गुलदस्त्यात आहे. शरद पवारांच्या खडकी येथील सर्वात शेवटच्या संवाद कार्यक्रमात जयंत पाटील हे गैरहजर होते. त्याचवेळी त्यांची अमोल मिटकरींसोबत भेट झाल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात 'एबीपी माझा'ने आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या मुद्यावर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र, सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात. काही वेळ आल्यावर सांगायच्या असतात, असे वक्तव्यही केले. आमच्या गटाकडून अद्यापही समेटासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मिटकरींनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा बोचरा वार
अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोचरा वार केला. शरद पवार आज अकोला (Sharad Pawar Akola) दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A.)घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.