Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसा, एकदिलाने मदतीसाठी पुढे या; अजित दादांच्या पक्षातील चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून भावनिक साद
Maharashtra Flood : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक हृदयस्पर्शी आवाहन केलं आहे.

Maharashtra Flood अकोला : मराठवाड्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. धाराशिव, बीड, लातूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिकांना घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागतंय. पूरग्रस्त भागात (Maharashtra Flood) अन्नधान्य, औषधे, कपडे, निवारा, शालेय साहित्य यांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून लोक अक्षरशः हालअपेष्टा सहन करतायत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar NCP) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक हृदयस्पर्शी आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी एक जाहीर पत्रच चित्रपटसृष्टीच्या नावाने लिहिलंय.
पूरग्रस्तांच्या डोळ्यातला अश्रू पुसणं हीच खरी समाजसेवा (Ajit Pawar NCP on Maharashtra Flood)
ते पत्रात म्हणाले की, “याच मराठवाड्यातील लोकांनी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला, नाटकांना आणि कलाकारांना कायम खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. आज हीच ती वेळ आहे, जेव्हा आपण त्यांच्यासाठी पुढे यावं. निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, दिग्दर्शक यांनी आपल्या परीने मदतीचा हात दिल्यास हजारो पूरग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी दिलासा मिळेल.”
पाटील पुढे म्हणाले, “पूरग्रस्तांच्या डोळ्यातला अश्रू पुसणं हीच खरी समाजसेवा आहे. छोटासा हातभारही त्यांच्यासाठी मोठा आधार ठरू शकतो. चला, मराठवाड्याच्या दुःखात आपण सर्वांनी मिळून दिलासा देऊया.” पूरस्थितीने मराठवाड्यातील असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आपलं घरदार, शेती-जमीन, जनावरे गमावली आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांनी एकजुटीने मदत मोहिम राबवावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
शेवटी, ते म्हणाले की , “पूरग्रस्तांना आपली मदत हीच त्यांची मोठी ताकद ठरेल. कला आणि संस्कृतीने आपल्याला जे दिलंय, त्याची परतफेड करण्याची हीच वेळ आहे.” राष्ट्रवादीच्या या आवाहनाला आता चित्रपटसृष्टी कशी प्रतिसाद देते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत, NDRF निकषांनुसार दर निश्चित (Rates Fixed as per NDRF Norms)
महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल, अशी घोषणा सरकारकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. तसेच, गरज पडल्यास निकष बाजूला ठेवून मदत केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते. 27 मार्च 2023 रोजी राज्य सरकारने शासन आदेश प्रसारित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये द्यायच्या मदतीचे दर 2026 पर्यंत निश्चित केले आहेत. हे दर केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषांवर आधारित आहेत. जमीन खरवडणे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 5,000 ते 47, 0000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळेल. शेत जमिनीवर तीन इंचापेक्षा जास्त गाळ आल्यास 2,200 ते 18,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळेल.
शेती पिके आणि फळ पिकांसाठी कोरडवाहू क्षेत्रात 8,500 रुपये प्रति हेक्टर, तर सिंचन क्षेत्रात 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल. दुधाळ जनावरे दगावल्यास 37,500 रुपये, बैल दगावल्यास 32,000 रुपये, वासरू, खेचर, शिंगरू, गाढव दगावल्यास 20,000 रुपये, बकरी, शेळीसाठी 4,000 रुपये आणि कोंबड्यांसाठी 100 रुपये मदत निश्चित केली आहे. घर पडल्यास 1,20,000 रुपये, डोंगरी भागातील कच्चा घर पडल्यास 1,30,000 रुपये, पक्क्या घराचे नुकसान झाल्यास 6,500 रुपये, कच्च्या घराचे नुकसान झाल्यास 4,500 रुपये आणि झोपडी पडल्यास 8,000 रुपये मदत मिळेल. पुरामध्ये जीवित हानी झाल्यास 4,00,000 रुपये मिळतील.
आणखी वाचा
























