Shirdi News : थोरात-विखे पुन्हा आमनेसामने; वाळू धोरण कधी येणार याची आम्हीही वाट पाहतोय, थोरातांचा विखेंना टोला
Shirdi News : माजी महसूलमंत्री आणि विद्यमान महसूलमंत्री यांच्यातील वादाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. या वादाला निमित्त ठरली आहे राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात घेतलेली जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक.
Shirdi News : कधीकाळी एकाच पक्षात असताना ज्या दोन नेत्यांचे कधीच जमले नाही, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. माजी महसूलमंत्री आणि विद्यमान महसूलमंत्री यांच्यातील वादाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. या वादाला निमित्त ठरली ती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर (Sangamner) या मतदारसंघात घेतलेली जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक.
महसूलमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री थोरात यांच्या मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. काही महिन्यांपूर्वी स्टोन क्रशर चालक आणि खाणी मालकांना गौणखनिज प्रकरणी तब्बल 765 कोटींचा दंड ठोठावला होता. त्यानंतर सातत्याने विविध सूचना देत संगमनेर मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरात जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांसह योजनेच्या ठेकेदारांना सार्वजनिक रित्या सुनावल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. याच प्रकरणावरुन आता थोरात यांनी विखेंवर टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आजी-माजी महसूलमंत्री वाद कोणत्या दिशेन जाणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते विखे पाटील?
महसूलमंत्री विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री थोरातांच्या मतदारसंघात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कामाचे कत्राट घेणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. "या अगोदर तुम्हाला कंत्राट कसे आणी कुणी मिळवून दिले हे जाहीरपणे मला सांगायला लावू नका. आम्ही आमचे मालक आहोत या भ्रमात तुम्ही राहू नका," असा सज्जड दम त्यांनी भरला. तर अधिकाऱ्यांनीसुद्धा आगामी काळात योजनेचं काम गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही दिला. तसंच "कंत्राटदारांनी आमच्या राजकारणाच्या भानगडीत पडू नये ते आमचं काम आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की, आपल्याला काही होणार नाही तर तुमचा भ्रम मी लगेच दूर करु शकतो," असा इशारा विखे पाटील यांनी दिला.
बाळासाहेब थोरात आक्रमक
दरम्यान, या बैठकीनंतर आता माजी महसूलमंत्री बालसाहेब थोरात सुद्धा आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी कंत्राटदार आणी अधिकाऱ्यांना अशाप्रकारे धमकावणे चुकीचं असून ते आपल्या बगलबच्च्यांना विचारत चला असा आग्रह धरताना दिसत आहेत, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याच वेळी बोलताना थोरात यांनी नवीन वाळू धोरणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहतोय असं सांगताना एक हजार रुपये ब्रासच्या वाळूची वाट आम्ही पाहतोय असा टोला विखे पाटील यांना लगावला. तर गुजरातची वाळू आपल्याकडे आणि आपला महसूल गुजरातला जातोय, असं सांगताना तिकडून निरमा पावडर सुद्धा येते अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राज्य सरकारकडून मिळणार घरपोच वाळू; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती