राज्य सरकारकडून मिळणार घरपोहोच वाळू; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Ahmednagar News Update : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी राज्य सरकार आता घरपोहोच वाळू देणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
Ahmednagar News Update : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. "राज्याच्या महसूल खात्याच्याकडून आता वाळू (sand) घरपोहोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही, तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी दिली आहे. अहमदनगरमधील बहुप्रतीक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुईछत्तीशी येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती.
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली. "साकाळाई योजनेवरून जिल्ह्यात मोठं राजकारण झालं. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून केवळ जनतेला आशेला लावलं जात होतं. मात्र आमच्या सरकारच्या काळात केवळ घोषणा नाही तर प्रत्येक काम केलं जातं हे आम्ही आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिलं, असं मंत्री विखे-पाटील म्हणाले.
पारनेर तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला होता. मात्र त्यावरून खासदार सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका केली. "महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आहे. आम्ही पुराव्यानिशी बोलतो, आमच्याकडे कागद आहे. कोणत्या कामाला कुणाच्या विनंतीवरून निधी मिळाला याची माहिती आमच्याकडे आहे. जर कुणाला ही कागदपत्रे हवी असतील तर माझ्याकडून घेऊन जावू शकता, असा खोचक टोला यावेळी सुजय विखे-पाटील यांनी लगावला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- सेना जागा वाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलण्यास सुजय विखेंनी टाळलं. मी खासदार आहे आणि या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाही असं सुजय विखे-पाटील यांनी यावेळी म्हंटलं.
महत्वाच्या बातम्या