Ajit Pawar : संग्राम जगतापांची मुस्लिमविरोधी भूमिका मान्य नाही, कारणे दाखवा नोटीस पाठवणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम
Sangram Jagtap : पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणत्याही आमदार-खासदाराने भूमिका घेतल्यात ती मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे संग्राम जगतापांवर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल.

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समूदायाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली. संग्राम जगतापांची (Sangram Jagtap) भूमिका चुकीची आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. पक्षाच्या विचारधारेच्या वेगळी भूमिका मान्य नसल्याचंही ते म्हणाले.
दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा असं वादग्रस्त आवाहन राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं. संग्राम जगताप यांनी या आधीही अनेकदा मुस्लिम विरोधी भूमिका घेतली होती. त्यावर अजित पवारांनी या आधीही समज दिली होती. त्यानंतर आताही तशाच प्रकारचं वक्तव्य जगतापांनी केलं.
Ajit Pawar On Sangram Jagtap Statement : नोटीस पाठवणार
संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य चुकीचं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत. एकदा का पक्षाचं ध्येयधोरण ठरलं तर पक्षाच्या विचारधारेपासून वेगळी भूमिका घेत कुठलाही खासदार-आमदाराने किंवा नेता असे बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजिबात मान्य नाही. तशी आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहणार."
Sangram Jagtap Statement : काय म्हणाले होते संग्राम जगताप?
सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की, दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत.
Sangram Jagtap Hindu Muslim Statement : जगतापांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. त्यातून ते सातत्याने मुस्लिम विरोधी वक्तव्य करताना दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकजण त्यांच्यावर नाराज आहेत.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही नाराजी अजित पवारांपर्यंत पोहोचवली आहे. अजित पवारांनीही संग्राम जगताप यांना वेळोवेळी समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चामध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजही नाराज झाल्याचं दिसून येतंय.
संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी जरी कारवाई केली तरी जगतापांना भाजपची वाट मोकळी असल्याचं चित्र आहे. कदाचित त्यामुळेच संग्राम जगताप हे उघड-उघड हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसत आहेत अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.
पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणत्याही आमदार-खासदाराने भूमिका घेतल्यात ती मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे संग्राम जगतापांवर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा:
























