(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar News : अहमदनगरच्या दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे-शंकरराव गडाख यांच्यात काटे की टक्कर? 1991 ची पुनरावृत्ती होणार का?
Ahmednagar News :जर शंकराव गडाखांना उमेदवारी दिली गेली तर 1991 साली राज्यभर गाजलेल्या विखे विरुद्ध गडाख या लोकसभा निवडणुकीच्या लढतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येते आहे.
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेपाठोपाठ (Shirdi Loksabha) आता नगर दक्षिणच्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये खासदारांना आमदारकीचे तिकीट दिल गेले आहे आणि आता महाराष्ट्रात लोकसभेसाठी नगर जिल्ह्यातील आघाडीच्या आमदाराचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आलं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या विरोधात नेवासा मतदारसंघातील ठाकरे गटाला पाठिंबा दिलेले माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख (shankarao Gadakh) यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
1991 साली स्व. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe) आणि यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांच्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Newasa Loksabha) झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. यानंतर पुन्हा एकदा 2024 ला ठाकरे गटाला पाठिंबा दिलेले माजी मंत्री शंकरराव गडाख आणी सुजय विखे आमने सामने येण्याची शक्यता आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा विखे विरुद्ध गडाख लढत होण्याची शक्यता आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे गडाख यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. जर शंकराव गडाखांना उमेदवारी दिली गेली तर 1991 साली राज्यभर गाजलेल्या विखे विरुद्ध गडाख या लोकसभा निवडणुकीच्या लढतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येते आहे.
भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे बघितले जात आहे. सुजय विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे आणी शंकरराव गडाख यांचे वडिल यशवंतराव गडाख यांची 1991 साली झालेली लढत देशासाठी लक्षवेधी ठरली होती. ही निवडणूक न्यायालयीन लढाईपर्यंत गेली होती. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा मतदारसंघ दक्षिण लोकसभा मतदारसंघात नसला तरीही त्यांचा अहमदनगर दक्षिण मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनीही त्यांना उमेदवारी करण्यासाठी गळ घातली असून गडाखांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू असून पक्षाने जर आदेश दिला तर विचार करून निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य गडाख यांनी केल आहे.
उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही
दरम्यान मागील विधानसभेत अपक्ष निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधलं. उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही असा विश्वास पुन्हा एकदा शंकराव गडाख यांनी बोलून दाखवला. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीत ही जागा ठाकरे गटाला देण्यात येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. जर नगर दक्षिण लोकसभेची जागा ठाकरे गटाला दिली व शंकरराव गडाखाना उमेदवारी मिळाली तर निश्चितच सुजय विखेंसाठी आव्हानात्मक निवडणूक असेल हे नक्की आणि दोन्ही उमेदवार लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे राहतील हे निच्छित असल्याचे बोलले जात आहे.
निधीबाबत सरकार उदासीन
शंकरराव गडाख यावेळी म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात समाधानकारक पाऊस नाही. खरीप खरिपाची पूर्ण पिके नष्ट झाली असून शासन मात्र अद्यापही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असलेल दिसत नाही. दुष्काळाबाबत शासनाकडून अहमदनगर जिल्ह्यात पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच महाविकास आघाडी सरकार असताना 90 कोटींची मंजूर कामांना या सरकारने स्थगिती दिली. मागील बजेटमध्ये महाराष्ट्रात निधीचा वर्षाव झाला, मात्र माझ्या मतदारसंघात एक रुपया सुद्धा निधी दिला गेला नाही. नेवासा तालुक्यात सुद्धा मतदार व शेतकरीच राहतात. आमदारांना निधी नाही, मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना निधी देण्यात आला आहे. भविष्यात निधीसाठी संघर्ष करण्याची वेळ आली तरी करेल असा विश्वास गडाख यांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्वाची बातमी :