जलजीवन मिशनसाठी केंद्राचा 60 हजार कोटींची निधी, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांची माहिती
राज्य सरकाने काही केलं नाही मात्र केंद्राच्या योजनेचा लाभ घेताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपले फोटो लावले असल्याची टीका महसूलमंत्री विखे यांनी आपल्या भाषणातून केली.
मुंबई : जलजीवन मिशन अंतर्गत या खात्यासाठी पंतप्रधान मोदींनी 60 हजार कोटींचा निधी दिला असून 25 वर्षानंतर भारत कसा असेल याचा विचार करत केंद्र सरकार काम करत असून निधी वाटपात केंद्राने कधीही पार्टी, जात पाहून निधी दिला नसल्याच वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री विखे पाटीलसह उत्तर नगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीला 18 महिने बाकी असताना भाजपच्या मिशन 2024 ला प्रारंभ झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल तीन दिवसीय दौऱ्यावर आले असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौरा करत आहेत. काल कोपरगाव नंतर आज सकाळी राहाता येथे बैठक घेतल्यावर दुपारी संगमनेर शहरात संवाद मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिर्डी लोकसभा प्रभारी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर हे देखील उपस्थित होते. 2024 च्या निवडणुकीत भाजपचा शिर्डीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येईल असा शब्द विखे पाटील यांनी दिला असलायची माहिती यावेळी आमदार राहुल पाटील यांनी देताना या सगळ्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच याची सुरवात आज संगमनेर मधून करत असल्याचं सांगत बाळासाहेब थोरात यांच नाव न घेता टीका केलीय.
राज्य सरकाने काही केलं नाही मात्र केंद्राच्या योजनेचा लाभ घेताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपले फोटो लावले असल्याची टीका महसूलमंत्री विखे यांनी आपल्या भाषणातून केली. वाळू तस्करीमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत असून अवैध वाळू तस्करी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांचे बंद झाले तर तुम्ही चालू करू नका.. तुम्हाला लायसन्स दिलं असे समजू नका असा सल्ला विखे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याना वाळू तस्करी वरून दिल्यावर सभेत एकच हशा पिकला. तर शिर्डी व नगर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात 2024 ला भाजपचा खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आणू सांगताना उमेदवारी देताना जे मधल्या काळात सोडून गेले त्यांचा विचार करू नका असे सांगत शिंदे गटाला पाठिंबा दिलेले खासदार लोखंडे यांना नाव घेता विखे पाटील यांनी इशारा दिला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना राबविल्या मात्र निधी वाटप करताना राजकरण केलं नाही. निधी वाटपात जात पात किंवा पार्टी पाहिली नाही. सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची भावना त्यांच्या मनात असून जलजीवन मिशन सारख्या योजनेला 60 हजार कोटींची मोठा निधी त्यांनी दिला असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांनी भाषणातून दिली. मात्र जर कोणी हे आम्ही केलं अस सांगून गैरसमज तयार करत असेल तर त्यांनी राजकारणात थोडी तरी इमानदारी ठेवली पाहिजे असा सल्ला विरोधकांना दिला आहे.