मुंबई : महाआघाडीचं सरकार स्थापन होऊन 13 दिवस उलटले आहेत. तरी देखील अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये महत्त्वाच्या खात्यांवरून खातेवाटप अडलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाआघाडीत तीन खात्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय होत नसल्याने तिढा कायम आहे. गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावरून चर्चा अडली असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत खातेवाटपावरून चर्चा अडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप होईल अशी आशा महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शपथविधी होऊन तेरा दिवस झाले. मात्र अद्याप शपथ घेतलेले सहाही मंत्री हे बिनखात्याचे आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचं खातेवाटप कधी होणार हा प्रश्न कायम आहे. येत्या एक दोन दिवसात खातेवाटप होईल असा दावा काल बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यामुळे किमान आज तरी खातेवाटपाला मुहूर्त मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे.
नुकतचं पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. मंत्रिमंडळाने कामकाज करायला सुरुवात केली आहे. बहुमत चाचणी, विधानसभाध्यक्ष निवडणूक, विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती यासह इतर कामासाठी बोलवण्यात आलेलं विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप करु अशी घोषणा खुद्द नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अजूनही खातेवाटपाला मुहूर्त मिळालेला नाही. सरकारचे जाहीर झालेले सात मंत्री एकत्रितपणे काम करतो आहोत. सगळी खाती आम्ही सात लोकं व्यवस्थितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होईल असं काही होतं नसल्याचंही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं होतं.
मात्र ज्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली ते सहा मंत्री देखील बिनखात्याचे मंत्री आहेत. या सहा मंत्र्यानाही अद्याप खाती मिळालेली नाहीत. आता नागपूरचं हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव्या मंत्रीमंडळाचे हे दुसरे अधिवेशन असणार आहे. 16 ते 21 डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपसारखा पक्ष आणि विरोधी पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासारखा प्रशासनाची माहिती असणारा नेता आहे. सोबतच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे अनुभवी नेते देखील विरोधात असणार आहेत. अनेक मुद्यांवरुन या अधिवेशनात सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव ठाकरे यांना म्हणावा असा प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळं खातेवाटप होणे गरजेचे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
असा आहे महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेला 15 मंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 मंत्रिपदं आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदं मिळणार होती. यामध्ये शिवसेनाला 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपद होती. मात्र नवीन फॉर्मुल्यानुसार एक वाढीव मंत्रीपद आता राष्ट्रवादीच्या पदरी पडलं आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा विचार सुरु आहे.
आता नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्रीपद आणि 11 कॅबिनेटसह चार राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. राष्ट्रवादीला 16 मंत्रीपदं मिळणार आहेत. यामध्ये 12 कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदही आहे. तर काँग्रेसला 13 मंत्रीपदं मिळणार आहेत. यामध्ये 9 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदही देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. या सहा मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली आहे. काँग्रेसकडून नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीकडून जंयत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.