एक्स्प्लोर
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोंदियात अॅसिड हल्ला, तरुणी गंभीर
दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर अॅसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर अॅसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागली. गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना देत सदर मुलीला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
गोंदिया : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमाच्या द्वारे अॅसिड हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवला गेल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे अॅसिड हल्ले मात्र थांबायचे नाव घेत नाहीत. आता विदर्भातील गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर जीवघेणा अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
गोंदियाच्या खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर दोन अज्ञात इसमांनी अॅसिड टाकत पळ काढला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. खळबांधा गावात राहणारी सदर तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी ती स्वगावी आली होती. आज ती पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली होती.
यावेळी दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर अॅसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर अॅसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागली. गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना देत सदर मुलीला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचाराकरता नागपूरला हलविण्यात आले. गंगाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेत सरकारने असे कृत्य हे नृशंस गुन्हा म्हणून गणला जाईल आणि पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे. अॅसिड हल्ल्याचे कृत्य हा अत्यंत घृणास्पद गुन्हा म्हणून गणला गेल्यास अशा खटल्यांमधील आरोपीला अधिकाधिक शिक्षा म्हणून जन्मठेप किंवा मृत्युदंड देणे शक्य होईल, असे केंद्र सरकारने याआधीच जाहीर केले आहे. मात्र तरीही अॅसिड हल्ले रोखले जात नाहीयेत. आता गोंदियातल्या या हल्लानंतर ग्रामीण भागापर्यंत अॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अॅसिड कुठून आले? असा सवाल देखील गावकरी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement