NMC : 73 सफाई कर्मचारी कामावरुन गायब; झोनमधील अस्वच्छतेवरून धरमपेठ झोनच्या स्वच्छता निरीक्षकालाही नोटीस
सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी शहरभरातून येत होत्या. जबाबदार आरोग्य निरीक्षकही लक्ष देत नसल्याने मनपा उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांनी विविध झोनमध्ये आकस्मिक भेट देणे सुरु केले आहे.
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली, लकडगंज, गांधीवाग आणि लक्ष्मीनगर झोनमधील 73 सफाई कर्मचारी कामावरून गायब आढळून आले. त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे. तसेच सक्त ताकीदही देण्यात आली. तसेच धरमपेठ झोनमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे स्वच्छता निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
त्यांच्या आकस्मिक भेटीत काही कर्मचारी कामावर गैरहजर असल्याची बाब उघडकीस आली. सफाई कर्मचारी कामावर गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत असल्याने डॉ. महल्ले यांनी 24 जून पासून प्रत्यक्ष रस्त्यांवर आकस्मिक भेटीची मालिका सुरू केली. यात आज धंतोली धोनमध्ये भेट दिली. यावेळी त्यांना आठ सफाई कर्मचारी गैरहजर आढळून आले. यापूर्वी 24 जूनला लक्ष्मीनगर, 25 जून रोजी गांधीबाग झोन आणि सोमवारी लकडगंज झोन येथे भेट दिली होती. कालपर्यंत एकूण 65 सफाई कर्मचारी गैरहजर होते. मात्र आकस्मिक भेटीच्या मालिकेची माहिती मिळाल्यामुळे आज फक्त 8 कर्मचारी गैरहजर आढळून आले.
गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी एक दिवसाचे वेतन कपात करणे आणि हजेरी रजिस्टरची तपासणी करून गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावानिशी लेखी ताकीद देण्याबाबत झोनच्या सहायक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य निरीक्षकांना 48 तासांत मागितले उत्तर
गैरहजर कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची आहे. कर्तव्यात कसूल केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 48 तासांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गैरहजरला हजर करण्याची 'सेटिंग'
अनेक सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य निरीक्षकांसोबत सेटिंग असून त्यांना गैरहजर असून हजर दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. यात आरोग्य निरीक्षक 'लक्ष्मीदर्शना'नंतर गैरहजर असलेल्यांना हजर दाखवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अनेक सफाई कर्मचारी हे माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करत असून पदाधिकाऱ्याच्या दबावामुळेही अनेकांची हजेरी लावल्या गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सध्या उपायुक्तांच्या आकस्मिक भेटीच्या सत्रामुळे अनेकांची 'सेटिंग' बिघडली असल्याचे दिसून येत आहे.