Nagpur Crime : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, 19 वर्षीय तरुणीसह दोघांनाअटक
आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी कामठी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक केली आहे. काल अटक करण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तरुणीला आधीच अटक करण्यात आली होती.
नागपूरः सोशल माध्यमांवर धर्मगुरुंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व पोस्ट प्रकरणात कामठी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणीला अटक केली असून अन्य दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने आरोपी तरुणींस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणातील आरोपींनी अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रात्री कामठी येथील दोन्ही पोलिस ठाण्याचा घेरावही केला होता. यामुळे शहरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या भूमिकेमुळे तणाव निवळला.
या प्रकरणात कामठीतील काटी ओळ भागात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीस अटक झाली असून रौनीभाई उर्फ रौनक यादव व अमन मेमन (दोघेही राहणार कामठी) यांचा शोध सुरु केला आहे. या तिघांविरुद्ध कामठी (नवीन) पोलीस ठाण्यात भादंवि 295, 153, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी तरुणीला कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कामठीचे पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी दिली. रात्री घटना घडताच पोलिस आय़ुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व प्रमुख पोलिस अधिकारी कामठी शहरात दाखल झाले होते. पोलिसांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळत नागरिकांना शांत केल्याने तणाव निवळला.
प्रभावी 'रूट मार्च'
वादाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या नेतृत्वात सोमवारी इस्माईलपुरा, विणकर कॉलनी, जयभीम चौक, लकडगंज, गवळीपुरा, जयस्तंभ चौक, हैदरी चक, मोंढा, राम मंदिर, कादर झेंडा, खलासी लाईन, भाजी मंडी, रब्बानी चौक, इमलीबाग, फुटाना ओळ, फेरुमल चौक, शुक्रवारी बाजार, महात्मा गांधी चौक, मेन रोड मार्गे रुट मार्च काढला. यात राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, अतिशीघ्रकृती दल तसेच सशस्त्र पोलिस जवान सहभागी झाले होते.