वजनाबाबत जास्त जागरूक कोण? स्त्रिया की पुरुष? तुमचाही अंदाज चुकणार
महाराष्ट्रात 23.4 % महिला स्थूल तर पुरुषांची हीच संख्या त्याहून जास्त म्हणजे 24.7% एवढी आहे.
नागपूर : वजनाबाबत जास्त जागरूक कोण? स्त्रिया की पुरुष हा प्रश्न जर विचारला तर त्याचे देशात उत्तर आहे चक्क पुरुष! पण महाराष्ट्रात मात्र ह्याच्या अगदी उलट बघायला मिळतय कारण आपल्या राज्यात मात्र पुरुषांच्या तुलनेत स्थूलतेला घेऊन महिला काकणभर का होईना पण जास्त जागरूक आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेने ही माहिती दिली आहे.
देशात 36.3 % महिलांचे वजन त्यांच्या बॉडी मास इंडेक्सपेक्षा जास्त आहे. मात्र देशात असे फक्त 31.1% स्थूल पुरुष आहेत. महाराष्ट्रात 23.4 % महिला स्थूल तर पुरुषांची हीच संख्या त्याहून जास्त म्हणजे 24.7% एवढी आहे. मात्र असे जरी असले, तरी शहर आणि ग्रामीण भाग ह्यात मात्र वजनाचा बराच फरक आढळला आहे. ग्रामीण भागातील लोक वजनाच्या दृष्टीने जास्त फिट आहेत.
जास्त वजन असणाऱ्या शहरी महिला 29.6% तर ग्रामीण महिलांमध्ये 18.3% आहे. जास्त वजन असणारे शहरी पुरुष 28.9% तर गावातील पुरुष मात्र 21.3% आहे. अहवालानुसार स्थूलत्व असणाऱ्या महिलांमध्ये 44.5% तर 40.7 % पुरुषांचा कंबरेचा घेर हा धोकादायक पायरीवर आहे. अशा महिलांच्या कंबरेचे माप 85 तर पुरुषांच्या कंबरेचे माप 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. जाणकार याचे विश्लेषण जागरूकतेपासून ते वेळेचा अभाव अशा बऱ्याच कारणांवर करू शकतात. वजन कमी असणे ही आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. या बाबत मात्र आकडे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्ये ही गेल्या पाच वर्षात सुधारलेले दिसत आहेत.
दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. अतिलठ्ठ व्यक्तींकडे समाज एक वेगळ्याच नजरेने पाहतो. व्यक्तीच्या स्वभावापेक्षा त्याच्या बाह्य रुपावरुन लोक त्याच्याशी कसं वागणं हे ठरवतात आणि त्यापद्धतीने त्याला वागणूक देतात. त्यामुळे लठ्ठपणामुळे अनेक लोकांना घराबाहेर पडणे अवघड होते. लोक त्यांची खिल्ली उडवतात म्हणून या लठ्ठ व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. ते सतत उपहासाचे विषय बनतात. यासाठी काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीरच्या आकाराबद्दल कोणाकडूनही सल्ला घेतात. याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर पडतो. आपण इतरांसारखे नाही किंवा आपल्यात कमतरता आहे या विचारांनी त्यांच्यामध्ये नैराश्य हा आजार अधिक दिसून येतो. महत्त्वाचं म्हणजे, लठ्ठ पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.
संबंधित बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )