(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी चिंचोलीला मुक्कामी, आज श्रींचे चंद्रभागेच्या तीरी स्नान; उद्या पंढरपुरात पोहचणार
Ashadhi Wari : संत मुक्ताबाईंची पालखी काल पंढरपुरात दाखल झाली, त्यांनतर आज निवृत्तीनाथांची पालखी चंद्रभागेच्या तीरी पोहचणार आहे.
Sant Nivruttinath Palkhi : 'देव पाहावयासी गेलो,तेथे देवची होऊनी ठेलो, पंढरीची वारी, वारी चुकू न देवो हरी, ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम..' असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या एक दिवसांत पंढरपूरला पोहचतील. तर राज्यातील सात दिंड्यापैकी मानाची दिंडी असलेल्या संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात पोहचली आहे. अनेक दिंड्या या पंढरपुरात पोहचल्या असून विठूरायाची नगरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) पंढरपूरच्या जवळ पोहचली असून कालच्या पांढरेवाडी येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी चंद्रभागेच्या तीरी वसलेल्या चिंचोलीकडे मार्गस्थ झाली आहे.
गेल्या चोवीस दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातून दिंड्यानी पंढरपुराकडे कूच केली आहे. अखेर पंचवीस दिवसांच्या पायी वारीनंतर अनेक दिंड्या पंढरपुरात पोहचल्या आहेत. अनेक दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर आहेत. त्या आज सायंकाळपर्यंत पंढरपुरला (Pandharpur) पोहोचतील. जवळपास चोवीस दिवसांहुन अधिक दिवसांचा पायी प्रवास करत मजल दर मजल करत दिंड्या पंढरपूरला पोहचत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून मुक्ताबाईंची पालखी काल पंढरपुरात पोहचली आहे. तर संत निवृत्तीनाथांची पालखी पांढरेवाडीला मुक्कामी होती. या मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरजवळील चिंचोलीकडे मार्गस्थ झाली आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. अवघ्या काही अंतरावर पंढरपूर असून एका मुक्कामानंतर दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहचतील. त्यामुळे दिंडीतला वारकरी सुखावला असून विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झाला आहे. कधी एकदाची पांडुरंगाची भेट होतेय, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे. संत निवृत्तीनाथांची दिंडी आज पांढरेवाडीहून निघून सायंकाळपर्यंत चिंचोलीला पोहचणार आहे. या मार्गात दुपारी श्रीक्षेत्र गुरसाळे येथे जेवण होणार असून विसावा घेतला जाणार आहे. याच ठिकाणी धावाआरती देखील होणार आहे. त्यानंतर सायंकाळी श्रीक्षेत्र चिंचोली येथे संत निवृत्तीनाथांच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान होईल, त्यांनतर चिंचोलीत मुक्काम असणार आहे.
नाथांची पालखी पंढरपुराजवळ पोहोचली
संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरजवळ पोहचली असून अवघ्या काही अंतरावर पंढरपूर आहे. अजून एक दिवसांचा मुक्काम केल्यानंतर नाथांच्या पालखी पंढरपुरात पोहचणार आहे. आजचा मुक्काम पंढरपूरजवळील चंद्रभागेच्या तीरी वसलेल्या चिंचोली गावात होणार असून त्यानंतर पंढरपूर शहराकडे मार्गस्थ होणार आहे. काल पांढरेवाडी येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने चिंचोलीला मुक्कामाला पोहचणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 420 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.