![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंदिरा गांधींचा आषाढीचा उपवास, तर पंढरपुरात येऊनही लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठल दर्शन न घेताच परतले; वाचा विठुरायाच्या दर्शनसाठी आलेल्या राजकारण्यांचे रंजक किस्से
Ashadhi Ekadashi : विठ्ठलाची शासकीय पूजा हा आषाढवारीचा सर्वोच्च टप्पा असला तरी या पूजेविषयीच्या अनेक गोष्टी आजही अज्ञात आहेत. अशाच काही रंजक गोष्टी आणि त्यांचे किस्से बालपणापासून पंढरपूरशी स्नेह असलेल्या अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत.
![इंदिरा गांधींचा आषाढीचा उपवास, तर पंढरपुरात येऊनही लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठल दर्शन न घेताच परतले; वाचा विठुरायाच्या दर्शनसाठी आलेल्या राजकारण्यांचे रंजक किस्से Ashadhi Ekadashi Jawaharlal Nehru indira gandhi Manohar Joshi Interesting stories of politicians who came to visit Vitthal mandir in Maharashtra Pandharpur Ashadhi Wari इंदिरा गांधींचा आषाढीचा उपवास, तर पंढरपुरात येऊनही लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठल दर्शन न घेताच परतले; वाचा विठुरायाच्या दर्शनसाठी आलेल्या राजकारण्यांचे रंजक किस्से](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/a98eb8899fc5c4d79c589f812c6fe087168793485503789_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : पंढरपूरच्या (Pandharpur News) सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने हजारो वारकरी कित्येक किलोमीटर प्रवास करत पंढरीत पोहोचले आहेत. उद्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. भल्या पहाटे होणाऱ्या या पूजेच्या मंगलमयी वातावरणाची अनुभूती घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. विठ्ठलाची शासकीय पूजा हा आषाढवारीचा सर्वोच्च टप्पा असला तरी या पूजेविषयीच्या अनेक गोष्टी आजही अज्ञात आहेत. अशाच काही रंजक गोष्टी आणि त्यांचे किस्से बालपणापासून पंढरपूरशी स्नेह असलेल्या अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत.
पंढरपूरच्या आजही अज्ञात असलेल्या रंजक गोष्टी
ब्रिटिशांच्या काळात आषाढी एकादशीला शासकीय पूजा कशी व्हायची?
ब्रिटिशांच्या काळात आषाढी एकादशील हिंदू कलेक्टर किंवा प्रांत अधिकारी यांना शासकीय पुजेचा मान दिला जायचा. त्या काळात ब्रिटीशांकडून आषाढी एकादशीसाठी दोन हजार रुपये अनुदान दिले जायचे. हा प्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत चालू होता. नंतर महाराष्ट्रातील मंत्री येण्यास सुरुवात झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर शासकीय पूजा कोणी केली?
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीला येऊन पहिली पूजा केली. तसेच त्यांनी ब्रिटिशांपासून सुरु असलेलं 2000 रुपयांचे अनुदान 20 हजार केले. त्यानंतर वसंतदादा पाटील पंढरपुरात आले आणि त्यांनी पूजा केली. त्या काळात यात्रेकरुंना यात्राकर लावला जायचा. वसंतदादांनी तो यात्राकर पंढरपूरात येताच रद्द केला. तसेच पंढरपूरसह आळंदी देहूचा देखील यात्राकर रद्द केला.
कोणाच्या काळात शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरु झाली?
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची प्रथा सुरु झाली. मंत्री यायचे आणि पूजा करायचे त्यामुळे वारकऱ्यांना खूप वेळ उभ राहावे लागत होते, म्हणूनच मनोहर जोशी यांनी हा निर्णय घेतला. तसेच कोण पूजा करणार यावरुन वाद व्हायचे. या सर्व गोष्टी लक्षात घेत मनोहर जोशींनी मुख्यमंत्र्यांनीच पुजा करण्याची प्रथा सुरु केली.
लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठलाचं दर्शन न घेताचं परत का गेले?
भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आले होते पण ते पंढरपूर स्थानकातूनच परत गेले. त्या काळात पंढरपुरात कॉलराची साथ होती. त्यामुळे कॉलराची लस टोचल्याशिवाय पंढरपुरात प्रवेश नव्हता. त्यावेळी लालबहाद्दूर शास्त्रींनी लस टोचण्यास विरोध केला. ‘मी आयुष्यात कोणतीच लस टोचली नाही त्यामुळे आताही टोचणार नाही’ असं म्हणत लालबहाद्दूर शास्त्रींनी स्टेशनवरुनच विठुरायाचे दर्शन घेणे पसंत केले आणि तेथूनच परत गेले.
वसंतदादा पाटील यांच्या पत्नीची कोणता नवस पूर्ण झाला?
वसंत दादा पाटील यांच्या सरकारात काही आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. त्यावेळी पत्नी शालिनी पाटील त्यांच्या मंत्री होत्या. एक दिवस त्या पंढपूरला पूजेला आल्या असता त्यांनी रुक्मिणीकडे पूजा करताना देवीला नवस केला. हा नवस त्यांनी वसंतदादांसाठी केला होता. “माझ्या भोळ्या दादांना पुव्हा मुख्यमंत्री करा” असा नवस त्या पंढपुरात बोलल्या होत्या. तसेच जर ते मुख्यमंत्री झाले तर मी पाच तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन येईन असेही त्या म्हणाल्या. रंजक म्हणजे पूजा केल्यानंतर काही काळाने दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शालिनी पाटील यांनी तो नवस पूर्ण केला.
पंडित जवाहरलाल नेहरु विठ्ठल मंदिरातील उंबऱ्याची लागली होती ठेच
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु 1953 मध्ये पंढपुरात आले. त्यावेळी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना ते उंबऱ्यावर ठेचाळले. या घटनेनंतर अनेकांनी त्यावा अपशकुनाचा दावा केला. मात्र त्यानी दर्शन घेतले. काही काळानंतर पंडित नेहरु ठेचाळलेला विठ्ठल मंदिरातील तो दगडी उंबरा पाडून नवीन बसवण्यात आला. तसा दगडी उंबरा आता फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळेल.
बाळासाहेब ठाकरे विठ्ठलावर उद्विग्न का झाले?
रायगड अधिवेशनानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1985 साली शिवसेना सगळीकडे पोहोचवायची असं ठरलं. त्यावेळी राम भंकाळ आणि अरुण पुराणिक बाळासाहेबांना विठ्ठलाच्या पूजेचं निमंत्रण द्यायाला गेले. त्यावेळी देशात घातापाताचे प्रकार फार होत होते. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले बाळासाहेब हीच वेळ आहे. तुम्ही पंढपुरात या. तेव्हा उद्विग्न होत बाळासाहेब म्हणाले “त्या विठ्ठलाला सांग नुसता डोळे मिटून, कमरेवर हात ठेऊन काय होणार? तू हातात जोडा घे आणि धर्मांदशक्तीना ठेचून काढ”. पण नंतर बाळासाहेब पंढरपूरात आले सभा घेतली आणि दर्शन देखील घेतलं.
इंदिरा गांधींजीच्या उपवासाचा किस्सा काय?
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पंढपुरात आल्या असत्या त्यांनी सकाळी पाच वाजता सभा घेतली नंतर विठ्ठलाची पूजा देखील केली. खर तर त्या नास्तिक होत्या. पूजेनंतर त्याच्या आचाऱ्यांनी त्याच्यासाठी नाश्ता तयार केला होता. त्यात अंडी देखील होती. पण काही वेळाने नाश्ता पाहून त्यांच्या लक्षात आलं की आज एकादशीनिमित्त लोक उपवास करतात, तर मांसाहारही करत नाही. लगेचच त्यांनी आचाऱ्यांना दूध आणण्यास सांगितलं आणि त्यांनी फक्त दूध घेतले आणि पूर्ण दिवस उपवास केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)