(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Sickle Cell Day : सिकल सेल डिसिजबद्दल जागरुकता वाढवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
आज जागतिक सिकल सेल डिझिज दिन साजरा केला जात असून राज्यामध्ये एससीडीविषयीची जागरुकता अधिक वाढविण्याचा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
मुंबई: आज जगभरात सिकल सेल डिसिज दिन साजरा करण्यात येत आहे. सिकल सेल डिझिज (SCD) हा अनुवांशिक रक्तविकार असून ते भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. या आजारामुळे न्यूमोनिया, रक्तप्रवाहातील संसर्ग, स्ट्रोक आणि तीव्र किंवा दुर्धर वेदना अशा गुंतागुंतीच्या आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात.
सिकल सेल डिसिज रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगभरात नायजेरिया नंतर पहिला क्रमांक लागतोय. देशातील आदिवासी लोकसंख्येमध्ये एससीटीचे अंदाजे 1.8 कोटी रुग्ण तर एससीडीचे अंदाजे 14 लाख रुग्ण असण्याची शक्यता आहे. आदिवासी कामकाज मंत्रालयाच्या (Ministry of Tribal Affairs –MoTA) माहितीनुसार अनुसूचित जमातींमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक 86 बालकांपैकी एका बालकास एससीडी आहे. सिकल सेल आजाराचा हा वाढता भार लक्षात घेऊन आदिवासी भागांमध्ये रुग्ण आणि आरोग्यसेवा यांच्यातील दरी भरून काढण्याच्या हेतूने मंत्रालयाने सिकल सेल डिजिज सपोर्ट कॉर्नरची स्थापना केली आहे.
एससीडीरुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य परिषदेने नवजात बालकांची तपासणी, उपचार आणि सिकल सेल आजाराच्या रुग्णांचे समुपदेशन तसेच विवाह समुपदेशन आणि पालकांमधील आजाराचे निदान अशा मार्गांनी आजारास प्रतिबंध करणे अशा काही शिफारशी केल्या आहेत.
एससीडीच्या परिणामकारक व्यवस्थापनासाठी रुग्णांना हायड्रोक्सियुरिया (hydroxyurea) दिले जाते. इतर उपचारांमध्ये संसर्गांचा प्रतिकार करण्यासाठीची प्रतिजैविके आणि तांबड्या पेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स यांचा समावेश होतो.
“गर्भातील तसेच नवजात बालकाची अत्यंत सखोल तपासणी करण्यासारख्या उपाययोजना बंधनकारक केल्या जायला हव्यात. तसेच प्रौढ एससीडीरुग्णांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली न्यूमोकोक्कल लस दिली जायला हवी. आजाराच्या पुढील टप्प्यांमध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन), अक्युट चेस्ट सिंड्रोम आणि स्ट्रोक यांसारख्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. आणि म्हणूनच एससीडी, त्याचे स्क्रिनिंग आणि उपचारांचे पर्याय यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीस्वयंस्फूर्तीने पावले उचलली जायला हवं असं नॅशनल अलायन्स ऑफ सिकल सेल ऑर्गनायझेशन्स, एनएएससीओचे सचिव गौतम डोंगरे म्हणाले.
एससीडी व्यवस्थापनासाठी देखभालीची एक सर्वंकष कार्यपद्धती आणि बहु-ज्ञानशाखीय दृष्टीकोन आवश्यक असतो, जिथे या परिसंस्थेतील सर्व घटक एकत्र येऊन भारतातील सिकल सेल रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आणि संसाधने उपलब्ध करून देऊ शकतील. एक आरोग्यसमस्या म्हणून एससीडीची समस्या हाताळण्यासाठी भारताने 2018 मध्ये एक राष्ट्रस्तरीय धोरण तयार केले आहे, ज्यात हिमेफायलिया आणि थॅलेसेमिया यांसह सिकल सेल आजारासारख्या हिमोग्लोबिनोपॅथीजच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना आखून देण्यात आल्या आहेत. हे धोरण अद्याप अंमलात आणले गेलेले नाही आणि या धोरणाच्या सुधारित आवृत्तीवर सरकार या क्षेत्रातील विविध संबंधित घटकांच्या सोबतीने काम करत आहे. हे धोरण राष्ट्रीय स्तरावर अंमलात आल्यावर ते राज्य स्तरावर स्वीकारणे गरजेचे ठरेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )