Depression After Child Birth : प्रसूतीनंतर महिलांमध्ये पोस्टपार्टम डिप्रेशनची वाढती समस्या, 'ही' आहे यामागची कारणं
Early Symptoms Of Postpartum Depression : अलिकडच्या काळात महिलांमध्ये प्रसूतीनंतर डिप्रेशनची समस्या वाढताना दिसत आहे. याची लक्षणं कशी ओळखाल जाणून घ्या.
Postpartum Depression : घरात छोटा नवीन पाहुणा आल्यावर घरातील वातावरण फारच आल्हाददायक होऊन जातं. लहान बाळाच्या रडण्याचा आणि हसण्याचा आवाज दिवसभर ऐकू येतो. घरातील सर्वजण नवजात बाळासोबत खेळण्यात व्यस्त असतात, पण यावेळी बाळाच्या आईकडे अनेक वेळा दुर्लक्ष होते. नव्या पाहुण्याच्या स्वागतात सगळे गुंतलेले असतात आणि बाळाच्या आईकडे काहीसं दुर्लक्ष होतं. प्रसूती झालेल्या महिलेच्या शारीरिक आरोग्यसोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
डिलिवरी अर्थात प्रसूतीनंतर महिलेच्या शरीरात (Post Delivery Physical Changes) अनेक बदल होतात. याचा सर्वाधिक परिणाम महिलेच्या मनावर होतो. यामुळे महिलेच्या मनात वाईट विचार येण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये महिला आत्महत्या (Suicidal thoughts) करण्याचाही विचार येतो. प्रसूतीनंतर महिलांचं मानसिक आरोग्य खालावतं, त्यामुळे अशा वेळी त्यांनी अधिक समजून घेण्याची आणि त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.
पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय? (What is Postpartum Depression)
प्रसूतीनंतर म्हणजेच बाळाचा जन्म झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक शारिरीक आणि मानसिक बदल होतात. शारीरिक बदलांमुळे महिलेची मानसिक स्थिती खालावते. यामुळे नैराश्य येते, यालाच 'पोस्टपार्टम डिप्रेशन' म्हणजेच प्रसूतीपश्चात नैराश्य असं म्हणतात. महिलांच्या शरीरात गरोदरपणापासून ते प्रसूतीदरम्यान अनेक बदल होतात. याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. या काळात महिलांचे हार्मोन्स असंतुलित असतात. यामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.
पोस्टपार्टम डिप्रेशनची सुरुवातीचं लक्षणं
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात जेवढे बदल होतात, तेवढेच बदल बाळाच्या जन्मानंतरही होतात. यामुळे हार्मोनल पातळी असंतुलित राहते आणि महिलांना अनेक मानसिक आणि भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते.
'ही' आहेत सुरुवातीची लक्षणं
- मूड स्विंग (Mood Swings)
- मन उदास वाटणे
- कोणाशीही बोलायची इच्छा नसणे
- चिडचिड वाढणे
- रडावसं वाटणे
- एखाद्या कोपऱ्यात एकट बसण्याची इच्छा होणं
डॉक्टरांच्या मते प्रत्येक स्त्रीला प्रसूतीपश्चात नैराश्याची समस्या उद्भवत नाही. सुमारे 70 टक्के महिलांना पोस्टपर्टम डिप्रेशनचा समस्येचा सामना करावा लागतो. प्रसूतीपश्चात नैराश्याचे परिणाम एक ते दोन महिने टिकतात. त्यानंतर ही समस्या दूर होते. पण जर ही समस्या दूर झाली नाही आणि याकडे दुर्लक्ष केले गेले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
- निद्रानाश
- भूक न लागणे
- आत्महत्येचा विचार येणे
- बाळ रडल्यावर जास्त राग येणे
- भांडखोर प्रवृत्ती होणे
- स्वतःला दुखावण्याची भावना उत्पन्न होणे
- वस्तू आपटणे किंवा फेकणे
पोस्टपर्टम डिप्रेशनची कारण काय आहेत?
- आई झाल्यावर स्त्रीची जबाबदारी खूप वाढते. घरच्यांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही तर महिला खचून जाते.
- प्रसूतीनंतर महिलेचं शरीर कमकुवत होते. आरोग्याची योग्य काळजी न घेतल्याने अशक्तपणा वाढतो, ज्यामुळे चिडचिड वाढते.
- शरीर अव्यवस्थित बनणे आणि वाढलेलं वजन यामुळे महिला मासिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होतात.
- जर एखादी महिला व्यावसायिक असेल तर तिला कामाची आणि करिअरची देखील चिंता असते.
पोस्टपर्टम डिप्रेशनवरील उपचार
- प्रसूती पश्चात नैरश्यावर उपचार आणि प्रतिबंध करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, पाठिंबा आणि काळजी.
- यामध्ये स्त्रीच्या पतीची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपण तिच्यासोबत आहे, अशी जाणीव पतीने आपल्या पत्नीला प्रत्येक पावलावर देणं आवश्यक आहे.
- जेवण आणि औषधांसोबतच महिलेच्या आवडी-निवडीची काळजी घेणं. छोट्या-छोट्या गोष्टींमधून महिलेला आनंद मिळत राहिल्यास महिलेला तणावमुक्त राहण्यास मदत होते.
- या सर्व पद्धती स्त्रीला प्रसूतीनंतरच्या नैराश्यापासून सुरुवातीच्या टप्प्यावर संरक्षण देतात आणि समस्या असल्यास ती बाहेर काढण्यासही मदत करतात.
- जर परिस्थिती गंभीर असेल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )