जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे.
Narendra chapatgaonkar Death: ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी (25जानेवारी) पहाटे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यविश्व आणि न्यायव्यवस्थेतून मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. (Narendra Chapalgaonkar)
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी सन 1961 ते 62 मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले. मराठवाडा, मराठवाड्यातील सामाजिक वास्तव उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवण्यात नरेंद्र चपळगावकर यांचा मोठा सहभाग होता. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. 16 वर्षे वकिली केल्यानंतर मुंबईत काही काळ वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायपीठ स्थापन झाल्यावर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
न्यायालयीन कारकीर्द
चपळगावकर यांनी 1962 ते 1978 या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर 1979 ते 1881 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि 1981 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची 19 जानेवारी 1990 मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून 20 नोव्हेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली. 10 एप्रिल 1999 रोजी ते निवृत्त झाले. मराठी साहित्यातला मोठा विचारवंत आणि अभ्यासक असणाऱ्या नरेंद्र चपळगावकरांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर टाकली आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके -
अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
आठवणीतले दिवस
कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
कायदा आणि माणूस
कहाणी हैदराबाद लढ्याची
तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
त्यांना समजून घेताना (ललित)
दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
नामदार गोखल्यांचं शहाणपण
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
राज्यघटनेचे अर्धशतक
विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
संघर्ष आणि शहाणपण
समाज आणि संस्कृती
संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
सावलीचा शोध (सामाजिक)
हरवलेले स्नेहबंध
हेही वाचा: