Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
Walmik Karad: वाल्मिक कराड याने आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. याचप्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाने वाल्मिक कराड (Walmik Karad) याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने एसआयटी (SIT) दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगितले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी प्रचंड मोठा धक्का ठरु शकतो.
गेल्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे, बीड यासह विविध भागांमध्ये जमीन, फ्लॅट अशा वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या संपत्तीचे आकडे डोके चक्रावणारे होते. वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याची चर्चा होती. याचे तपशील गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले होते. मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडची ही सर्व मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 107 (मालमत्तेची जप्ती, जप्ती किंवा पुनर्संचयित करणे) अंतर्गत अर्ज आधीच न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे.
वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड याला या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्याच्यावर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका लावण्यात आला होता. गेल्या सुनावणीवेळी एसआयटीने वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा उल्लेख केला होता. या संपत्तीचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार आता एसआयटीने वाल्मिक कराड याच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केली आहे. यापूर्वी सीआयडीने वाल्मिक कराड याची परदेशातही संपत्ती असू शकते, असा संशय व्यक्त केला होता. मात्र, आता एसआयटीने वाल्मिक कराडच्या मालकीच्या राज्यातील मालमत्तांवर टाच आणल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. वाल्मिक कराड याच्यासोबत त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेल्या जमिनी आणि फ्लॅटसवरही जप्तीची कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वाल्मिक कराडच्या अडचणीत भर, महादेव मुंडे खून प्रकरणाची चौकशी होणार
महादेव मुंडे खून प्रकरण तपास परळी पोलीस ठाण्याकडून काढून अंबाजोगाई डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता, अद्यापही याचे आरोपी पकडले गेले नाहीत. महादेव मुंडे यांच्यापत्नीने याबाबत सवाल उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनीही शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी वाचा